जालना : दाभोलकर हत्या प्रकरणी जालन्यातून आणखी एकाला ताब्यात घेण्यात आलंय. गणेश कपाळे याला औरंगाबाद एटीएसनं ताब्यात घेतलंय. आरोपी श्रीकांत पांगरकर याचा गणेश मित्र असल्याचं समोर आलंय. आज सकाळी शनीमंदिर भागातून पोलिसांनी गणेशला ताब्यात घेतलं. तो डीटीपी ऑपरेटर असून त्याचं झेरॉक्स आणि स्टेशनरीचं दुकान आहे. नालासोपारा स्फोटकं प्रकरणीही गणेशवर संशय आहे.
दरम्यान, नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात याआधी वैभव राऊत, शरद कळसकर, सचिन अंदुरे, त्याचे मेव्हणे अजिंक्य आणि शुभम तसंच राजेश बंगेरा, अमित डिगवेकर, अमोल काळे यांचीही नावं समोर आलीत. ते तपास यंत्रणेच्या ताब्यात आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर (67 वर्ष) यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात दोन मोटारसायकलस्वारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. दाभोलकर पुण्यात असताना मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. त्यावेळी सकाळी आठ ते साडे आठ दरम्यान त्यांची गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी अत्यंत जवळून त्यांच्यावर चार गोळया झाडल्या होत्या. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या दाभोलकरांचा जागीच मृत्यू झाला होता.