नितेश महाजन, झी मीडिया, जालना : जालन्यातील अंबड मधील वडीगोद्री भागांत काल रात्री ढगफुटी झालीय.त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेलीय.मुसळधार पावसामुळे या भागातील सर्व नदी नाल्यांना महापूर आला असून गेल्या २५ वर्षातील हा सर्वात मोठा पाऊस असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.वडीगोद्रीतील मांगणी नदीच्या पात्राबाहेर अर्धा किलोमीटर पुराचं पाणी शिरलं. हे पाणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये शिरलंय.
या पावसामुळे खरीपातील सोयाबीन,बाजरी,कपाशी तुर आणि ऊस पिकांचं अतोनात नुकसान झालंय पिकामध्ये दोन फुटापर्यंत पाणी साचल्याने शेतकरी चिंतेत पडलाय. १७० मिलिमीटर झालेल्या या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालय.अंबड तालुक्यातील गल्हाटी नदीला देखील पूर आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा दिलाय.
वडीगोद्री मंडळात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या २०३ टक्के पाऊस झाला आहे.परीणामी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केलीय.
३०-३५ वर्षात असा पाऊस आम्ही पाहिलेला नाही.नुकसान खूप झालेलं आहे याची शासनाने दखल घ्यावी.ऊस,कपाशी आणि सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे.शेतकरी काळजीत पडल्याचे शेतकरी लक्ष्मण मिसाळ
नुकसान खूप झालं आहे.पीकविमा भरूनही याआधी नुकसान भरपाई मिळाली नाही.या पावसामुळे बाजरी,तूर,कपाशी आणि ऊस पीक पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे शेतकरी छगन घुले यांनी सांगितले.
प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिलायं.