'बचतगटा'च्या माध्यमातून उभा राहिलेला देशातील 'गृहप्रकल्प'

पुण्यासारख्या शहरात स्वत:चं घर असावं, असं कुणाला वाटणार नाही... मात्र, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी हे दिवा स्वप्नचं... पण घरकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करुन दाखवलीय.

Updated: Mar 2, 2018, 11:54 AM IST
'बचतगटा'च्या माध्यमातून उभा राहिलेला देशातील 'गृहप्रकल्प' title=

अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : पुण्यासारख्या शहरात स्वत:चं घर असावं, असं कुणाला वाटणार नाही... मात्र, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी हे दिवा स्वप्नचं... पण घरकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करुन दाखवलीय.

पुण्यातील उरुळी देवाची या भागामध्ये दिमाखात उभा असलेला 'वैष्णवी सिटी' हा गृहप्रकल्प... इतर गृहप्रकल्पांसारखाच वेल प्लॅन्ड आणि उत्तम दर्जाचं बांधकाम असणारा... हा प्रकल्प कोणीही बांधकाम व्यावसायिकाने उभारलेला नाही... तर तो उभा राहिलाय इथं वास्तव्याला असणाऱ्या महिलांच्या बचतगटाच्या माध्यमातून... 

राजश्री नागाने यांची ही संकल्पना... २००६ साली महिला उन्नती बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बचतगटांना कर्ज आणि रोजगार मिळवून देण्यास सुरुवात केली पण त्यांचं उद्दीष्ट त्याही पलिकडले होतं. २००७ साली 'वैष्णवी सिटी'ची संकल्पना पुढे आली... आणि हक्काचं घर मिळवण्यासाठी या महिलांनी कंबर कसली.

जागा मिळविण्यापासून ते सगळ्या परवानग्या काढणं, कॉन्ट्रॅक्टर नेमणं, कामाची देखरेख करणं, महिलांना कर्ज मिळवून देणं या सगळ्यासाठी महिलांसह राजश्री नागाने यांनी रात्रीचा दिवस केला... आणि २०१६ साली वैष्णवी सिटी फेज-१ पूर्णत्वास आला. महिन्याला केवळ काही शे बचत करणाऱ्या महिलांनी एकत्र येत कोटींपर्यंत गुंतवणूक करुन ४०० सदनिका असलेला वैष्णवी सिटी हा गृहप्रकल्प उभा करून दाखवला.

'वैष्णवी सिटी'च्या यशस्वी उभारणीनंतर राजश्री नागाने यांनी वैष्णवी सिटीच्या फेज-२ची देखील पायाभरणी केली. यात बचतगटातील तब्बल ९०० महिलांना आपलं हक्काचं घर मिळणार आहे. १२० कोटीची गुंतवणूक असणाऱ्या या गृहप्रकल्पाचं बांधकाम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आता गृहप्रवेशासाठी या महिला उत्सुक आहेत.

इतक्यावरच न थांबता या महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरु करण्याचाही मानस राजश्री नागाने यांनी व्यक्त केलाय. वैष्णवी सिटीच्या उभारणीसाठी प्रशासनाने केलेल्या सहकार्याचे त्या आभार मानतात. मात्र, शहरापासून लांब असणाऱ्या या गृहप्रकल्पाला पक्के रस्ते आणि पाण्यासारख्या पायाभूत सुविधा अद्याप मिळालेल्या नाहीत. ज्यामुळे महिलांचं घरकूल तर झालंय मात्र सर्वसामान्यांसारख्या सुविधांपासून मात्र अद्याप त्या वंचित आहेत.

खरं तर बचतगटांच्या माध्यमातून आज हजारो महिलांना रोजगार मिळत आहे... त्या स्वत च्या पायावर उभ्या राहत आहेत मात्र महिलांनी संघटीत होऊन साकार केलेला हा पहिलाच गृहप्रकल्प... ज्यामुळे स्त्री शक्ती काय करु शकते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.