निलेश वाघ ,झी मीडिया, मनमाड : झेंडूचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचं ऐन दिवाळीत दिवाळं निघालं आहे. मनमाड बाजार समितीत झेंडूच्या फुलांना कवडीमोल भाव मिळतो आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दरवर्षी झेंडू ३० रुपयांच्या घरात असतो. मात्र यंदा मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूला अवघा ५ रुपये किलो इतका कमी दर मिळतो आहे. उत्पादन खर्च तर सोडाच मजूरी, वाहतूक हमाली आणि तोलाईचाही खर्च निघत नसल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला झेंडू रस्त्यावर फेकून दिला आहे.
परतीच्या पावसामुळे झेंडूच्या फुलांना मातीमोल किंमत मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कडू होणार आहे. मागणी नसल्याने फुलांना अक्षरशः 5 रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी वाहतूक खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः फुले मनमाड बाजार समितीच्या आवारात फेकून दिल्याने बाजार समितीमध्ये फुलांचा खच पाहायला मिळत आहे.
दसरा, दिवाळीला दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरी झेंडूच्या फुलांची लागवड करीत असतात . दिवाळी गोड होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते. दसऱ्याला 30 रुपये प्रतिकिलो विकलेली फुले दिवाळीत चक्क 5 रुपये किलोने विकली जात असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने फुले फेकून देणं पसंत केलं आहे.