स्वाती नाईक, प्रतिनिधी, झी मीडिया, नवी मुंबई : एकीकडे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत असताना, शेतक-यांच्या जीवावर चालवल्या जाणा-या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचं समोर आलंय.
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला आणि दाणा मार्केट अशी पाच मार्केट आहेत. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल अडत्यामार्फत किरकोळ व्यापाऱ्यांना विकला जातो.
या शेतमालावर व्यापाऱ्यांना सेझ भरावा लागतो. रोज लाखोंचा सेझ इथे गोळा केला जातो. त्यातूनच कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार चालतात. मात्र बाजार समितीच्या प्रशासन आणि संचालक मंडळानं नियमबाह्य पद्धतीनं या पैशांतूनच, विविध उच्चपदस्थांसाठी भेटवस्तू आणि जेवणावळींवर अक्षरशः लाखोंची उधळपट्टी केल्याचं दिसून आलंय.
विशेष म्हणजे अशा प्रकारे खर्च करण्याची कोणतीच तरतूद बाजार समितीच्या नियमावलीत नाही. अॅडवोकेट संतोष यादव यांनी २००६ ते २०१७ दरम्यान नवी मुंबई एपीएमसीकडून झालेल्या खर्चाबाबत, माहिती अधिकारात माहिती मागवली. त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली.
नवी मुंबई एपीएमसीची उधळपट्टी
- उच्चपदस्थ अधिकारी, मंत्री यांना २०१४-१५ वर्षात २० लाख रुपयांच्या आंब्याच्या पेट्या देण्यात आल्या
- पाहुण्यांसाठीच्या जेवणावळींवर महिन्याला ६० ते ७० हजाराचा खर्च केला गेला.
- विशेष लेखापरीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांचा राहाण्या आणि खाण्याचा थ्री स्टार हॉटेलचा खर्च बाजार समितीतून वळता केला गेला.
- बाजार समितीचं संचालक मंडळ आणि प्रशासनासाठी १८ फ्लॅट्स असतानाही, संचालक मंडळाची बडदास्त थ्री स्टार हॉटेलमध्ये केली गेली. त्याचा खर्च बाजार समितीला करायला लावला.
- वाहन सुविधेवरही प्रशासनाकडून पैसे मंजूर करुन घेतले गेले.
- या अवास्तव खर्चावर लेखा परीक्षण अहवालात ताशेरे ओढले गेले आहेत.
विशेष म्हणजे तत्कालीन संचालक प्रभू पाटील यांनी या अवाजवी खर्चांबाबत पणन संचलनालयाकडे लेखी तक्रार केली होती. मात्र पणन संचलनालयाकडून त्यावर कोणतीच दखल घेतली गेली नाही.
याबाबत आम्ही नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकांशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबतच चौकशीचं आश्वासन दिलं. गंबीर बाब म्हणजे एवढ्या मोठ्या नवी मुंबई बाजार समितीतच्या फळ मार्केटमधल्या इमारतीत चौथ्या मजल्यावर शेतकऱ्यांसाठी राहण्याची सोय आहे. मात्र सुविधांअभावी ती बंद आहेत. विशेष म्हणजे पाण्याची जोडणीही तोडण्यात आली आहे.