निखील चौकर, झी मीडिया, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यात एलईडी लावण्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आलाय.
विशेष म्हणजे ४८ लाखांचं हे काम ई टेंडर न काढताच खासगी ठेकेदारामार्फत करण्यात आलं. गंभीर बाब म्हणजे प्रत्यक्षात एलईडीच्या जागी सीएफलचे दिवे बसवले गेले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव नगर परिषदेनं एलईडी बसवण्यासाठी तब्बल ४८ लाखांची तरतूद केली होती. त्यापैकी नगर परिषदेच्या उपाध्यक्षा यमुनाताई ढोरकुले यांच्या वॉर्ड क्रमांक चारमध्येही एलईडी दिवे बसवण्यात येणार होते. मात्र, या वॉर्डमध्ये बसवलेल्या ८९ एलईडी दिव्यांचा खर्च तब्बल ६ लाख ८६ हजार २८४ रुपये इतका दाखवला गेला. याचाच अर्थ एका एलईडीची किंमत तब्बल ७ हजार ७११ रुपये दाखवली गेल्याचं, माहिती अधिकारात समोर आलंय.
झी मीडियाच्या टीमनं प्रत्यक्ष वॉर्डमध्ये जाऊन पाहणी केली असता, वीजेच्या खांबावर एलईडी दिव्याऐवजी चक्क सीएफएलचे बल्ब असल्याचं दिसून आलं.
स्थानिकांनी या घोटाळ्याबाबत तीव्र संताप व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय.
विशेष म्हणजे या सगळ्या भ्रष्टाचाराबाबत उपनगराध्यक्षा यमुनाताई ढोरकुले यांना विचारलं असता, आपल्याला याबाबत काहीच माहीत नसून आपला मुलगा हे काम पाहत असल्याचं अजब विधान त्यांनी केलं. त्याचवेळी नगराध्यक्षांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांकडे बोट दाखवलयं.
ज्या वॉर्डसाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले, तो परिसर मात्र, अजूनही अंधारातच आहे. त्यामुळे लाखोंचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल, ग्रामस्थ विचारतायेत.