पारदर्शक सरकारच्या समृद्धी महामार्गातही भ्रष्टाचार

Updated: Feb 26, 2018, 06:45 PM IST
पारदर्शक सरकारच्या समृद्धी महामार्गातही भ्रष्टाचार title=
व्हिडीओ जर्नलिस्ट अनिल सौंदड़े सह दिनेश दुखंडे, बुलडाणा : पारदर्शक कारभाराची ग्वाही देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गही भ्रष्टाचाराच्या आरोपातून सुटलेला नाही. 

अधिका-यांवर आरोप

जमीन आणि झाडांच्या मोबादल्याचं मूल्यांकन ठरवण्यासाठी सरकारी अधिकारीच लाच मागत असल्याचा आरोप काही शेतकरी करताहेत. बुलडाण्यात देऊळगाव राजा तालुक्यातल्या तुळजापूर गावातले शेतकरी भीमराव तिडके यांनी न्यायदानाच्या अपेक्षेने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी धाव घेतलीये. समृद्धी महामार्गासाठी त्यांच्या गावात सुरु असलेल्या भूसंपादनात सरकारी अधिका-यांकडून भ्रष्टाचार होत असल्याचा तिडके यांचा आरोप आहे. 

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

या प्रकल्पाला सुरुवातीला इतर शेतक-यांप्रमाणे तिडके यांचाही विरोध होता. पण पुनर्वसनाचा ५ पट मोबदला जाहीर होताच हा विरोध गळून पडला. या प्रकल्पात तिडके यांची साडेतीन एकर शेतजमीन जातेय. त्यात ते सोयाबीन, मूग अशी पिकं घेतात, तर डाळिंब, आवळा, लिंब अशी एकूण एक हजार ७०० झाडेही जाणार आहेत. तिडके यांनी प्रकल्पासाठी, झाडे जमीन देण्यास सहमती दर्शवल्यानंतर आता बरेच दिवस झाले आहेत. पण कागदोपत्री कार्यवाहीत खूप वेळ काढला जातोय, आणि त्यामागे शासकीय अधिकारी आणि त्यांच्या मध्यस्थांची आर्थिक मोबदल्याची अपेक्षा असल्याचा आरोप तिडके यांनी केलाय. प्रकल्पासाठी तालुक्यात नेमलेल्या अधिका-यांची त्यांनी मुख्यमंत्रयांकडे ऑनलाइन तक्रार केलीय.

पारदर्शकता नसल्याचाही आरोप

या प्रकल्पासाठी सुरु असलेल्या भूसंपादनात पारदर्शकता नसल्याचाही आरोप होतोय. तुळजापूरमधले आणखी एक शेतकरी सदानंद वाघमारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये त्याबाबत याचिका दाखल केलीय. वाघमारे हे बी. एस्सी, बीएड आहेत. पण त्यांनी गावात शेती करण्यास प्राधान्य दिलंय. या प्रकल्पात त्यांचीही जमीन जातेय. 

दाद कुणाकडे मागायची?

समृद्धी महामार्गासाठी भूसंपादन करताना जर सरकारी कुंपणच शेत खाऊ लागलं तर मग शेतक-यांनी दाद मागायची ती कुणाकडे ?  मुख्यमंत्री महोदय ऐकताय ना ?