येवला : सर्वत्र पसरत असलेल्या कोरोना व्हायरसचा फटका पोल्ट्री व्यावसायिकांबरोबरच येवल्यातील पैठणी व्यवसायाला देखील बसू लागला आहे. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे दक्षिण भारतासह इतर ठिकाणहून येणारा ग्राहकवर्ग बंद झाल्याने पैठणी उत्पादक आणि विक्रेते अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली.
लग्नसराई असल्याने पैठणी उत्पादक महागड्या पैठणी साड्यांचे उत्पादन करतात मात्र या पैठणी घेण्यासाठी बाहेरगावाहून येणारे ग्राहक कोरोनाच्या दहशतीमुळे येत नसल्याने पैठणी व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे.
याशिवाय, पैठणी व्यवसायासोबतच पर्यटन, धार्मिक स्थळ, पोल्ट्री व्यवसाय, औद्योगिक क्षेत्रालाही कोरोनाचा फटका बसतो आहे. कोरोना व्हायरसमुळे पर्यटनावर देखील परिणाम होत असल्याचं चित्र आहे. कोकणात सध्या ६० ते ७० टक्क्यांनी पर्यटकांची संख्या घटली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक देखील चिंतेत आहेत. शिवाय, गणपतीपुळे सारख्या ठिकाणी देखील भाविकांची संख्या कमी झाली आहे. एप्रिल आणि मे मधील बुकींक देखील सध्या पर्यटक रद्द करत असल्याने हॉटेल व्यवसायिकांनी चिंता व्यक्त केली आहे.
करोना विषाणूबाबत समाजमाध्यमातील चुकीच्या प्रचाराचा फटका बसल्याने मांसल कोंबड्यांची विक्री ५ ते ७ रुपये किलोने करूनही ग्राहक नसल्याने कुक्कुटपालन करणारे शेतकरी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत. हा व्यवसाय तीन आठवडय़ांमध्ये राज्यात ६५० कोटींच्या नुकसानीत गेला आहे.