कोरोनाच्या संकटात असं होणार निवृत्तीनाथांच्या पालखीचं प्रस्थान

कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये या वर्षीच्या वारीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते.

Updated: Jun 5, 2020, 10:50 PM IST
कोरोनाच्या संकटात असं होणार निवृत्तीनाथांच्या पालखीचं प्रस्थान title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : कोरोना व्हायरसच्या संकटामध्ये या वर्षीच्या वारीबाबत अनेक संभ्रम निर्माण झाले होते. पण यावेळी आषाढी निमित्त पायी पालख्या निघणार नाहीत, याबाबत वारकरी संघटनांमध्ये एकमत झालं आगे. गेल्या ३५० वर्षांपासूनची मानाची पालखी असलेली संतश्रेष्ठ गुरूमाऊली निवृत्तीनाथांची पालखी यावेळी शिवशाही बसने प्रस्थान करणार आहे. 

वारकऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या शनिवारी ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस पालखीचं पारंपरिकरित्या प्रस्थान होईल. संत निवृत्तीनाथांच्या पालखीत पादुकांची विधीवत पूजा, अभंगसेवा आणि आरती करण्यात येईल. पालखीत पादुकांना संजीवन समाधी मंदिरालाही प्रदक्षिणा करण्यात येईल. यानंतर शासनाने दिलेल्या परवानगीप्रमाणे विणेकरी टाळकरी यांच्यासह पादुकांचं शिवशाही बसने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होईल. कोरोना व्हायरसमुळे वारकऱ्यांनी उगाच गर्दी करुन शासनाच्या नियमांचं उल्लंघन करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दुसरीकडे देहू आणि आळंदीहून पायी निघणारी पालखीही यंदा निघणार नाही. आळंदी आणि देहूच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहेत. या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने न्यायच्या याबाबतचा निर्णय नंतर होणार आहे. पण देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत एकमत झालं.