मुंबई : महाराष्ट्रात कोरोना चाचणी केंद्र वाढणार आहेत. मुंबई आणि पुण्यातल्या कोरोना तपासणी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३४० वर पोहोचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक ७४ रुग्ण आहे. राज्यातली ही परिस्थिती बघता कोरोना चाचणी केंद्र वाढवण्याला परवानगी देण्यात आली आहे.
कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात यावी अशी विनंती वैद्यकीय शिक्षण विभागाने डिपार्टमेंट ऑफ हेल्थ रिसर्च अँड इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च कडे केली होती. यानंतर मुंबईच्या परळमधील हाफकिन इन्स्टिट्यूट तसंच पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून जनरल हॉस्पिटल यांना कोरोना चाचणी केंद्र सुरु करण्याला मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी केंद्रांच्या माध्यमातून वैद्यकीय शिक्षण विभागा मार्फत करोना तपासण्यांची क्षमता शंभराहून बावीसशे पर्यंत वाढविण्यात येत आहे, असंही अमित देशमुख यांनी सांगितलं.
मुंबईच्या भायखळातल्या जे.जे. महाविद्यालय रुग्णालयात अशाप्रकारचं चाचणी केंद्र उभारण्यात आलं आहे. या केंद्रालाही मान्यता मिळणार आहे. या तीनही तपासणी केंद्रातून रोज ६०० नमुन्यांची तपासणी करता येणार आहे.
सध्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत नागपूरमध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी एकच केंद्र उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयात चाचणीसाठी नव्या केंद्रांना मान्यता दिली जाईल. तसंच मुंबईच्या ७ खासगी प्रयोगशाळांमध्ये कोरोना तपासणीला मान्यता देण्याची विनंती करण्यात आली होती. यालाही तत्वत: मान्यता देण्यात आली आहे.
पी डी हिंदुजा नॅशनल हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, टाटा मेमोरियल सेंटर ऍडव्हान्सड सेंटर फोर ट्रीटमेन्ट, रिसर्च अँड एज्युकेशन इन कँसर, मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड,थायरोकेयर लॅबरोटरीज, एस आर एल डायग्नोस्टिक आणि रिलायन्स लॅबरोटरीज,नवी मुंबई यांना कोरोना तपासणीसाठी तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. दररोज १०० नमुने तपासण्याती या चाचणी केंद्रांची क्षमता आहे.
काही तांत्रिक गोष्टी पूर्ण होताच या प्रयोग शाळांमधूनही करोनाची चाचणी उपलब्ध होणार आहे.
लवकरच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याचप्रमाणे अकोला, धुळे, औरंगाबाद, सोलापूर, मिरज आणि लातूर येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेमध्येही तपासणी केंद्रे सुरू होणार आहेत यापैकी नागपूर येथील तपासणी केंद्राची क्षमता २०० तर अन्य केंद्रांची क्षमता प्रत्येकी १०० आहे.
उद्यापासून मुंबई आणि पुणे येथे नव्याने सुरू होणाऱ्या चाचणी केंद्रामुळे ६०० चाचण्या करण्याची सुविधा नव्याने निर्माण होणार आहे. खाजगी केंद्रांमधून दररोज ७०० तपासण्या होतील त्याचप्रमाणे लवकरच राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरू होणाऱ्या केंद्रातून ८०० चाचण्या अशा एकूण २,२०० करोना चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहेत, अशी माहितीही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.