'जनता कर्फ्यू' उद्यापर्यंत; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रातला कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जनता कर्फ्यू उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे

Updated: Mar 22, 2020, 06:36 PM IST
'जनता कर्फ्यू' उद्यापर्यंत; आरोग्यमंत्र्यांची घोषणा title=

मुंबई : महाराष्ट्रातला कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जनता कर्फ्यू उद्या पहाटे ५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. जनता कर्फ्यूनंतर उद्यापासून महाराष्ट्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.  जनता कर्फ्यू आणि जमावबंदीमधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळावा, असं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोरोनाचा धोका लक्षात घेता राज्यात ब्लड डोनेशन कॅम्प वाढवणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. ब्लड डोनेशन कॅम्पसाठी एनजीओची मदत घेतली जाणार आहे. तसंच नागरिकांनी ब्लड डोनेशन करावं, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे.

पुण्यातल्या ब्लड बँकांमधला रक्तसाठा कमी झाला आहे.  एका ठिकाणी १५ पेक्षा जास्त लोक येणार नाहीत, अशा पद्धतीने रक्तदान घडवून आणावे, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ब्लड बँकांना कालच दिली होती. 

कोरोना संशयित असलेल्या २१० जणांच्या नमुन्याची चाचणी सुरु आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच होम क्वारंटाईन असलेल्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांनी स्वत:ची काळजी घ्यावी, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात उद्यापासून जमावबंदी

काय सुरु असणार?

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं

धान्य, किराणा मालाची दुकानं

भाजीपाला वाहतूक

औषधांची दुकानं

बँका, शेअर बाजार आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था

वीजपुरवठा कार्यालयं

काय बंद असणार?

परदेशातून येणारी वाहतूक बंद

मालवाहतूक वगळता मुंबईची लोकलसेवा बंद

जीवनावश्यक वस्तूंची दुकानं वगळळता इतर दुकानं बंद

अत्यावश्यक सेवांसाठीचा वापर वगळता बेस्ट बसमध्ये सामान्य नागरिकांचा प्रवास बंद

शाळा, महाविद्यालयं बंद

मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह बंद

खाजगी कार्यालय बंद, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम सुविधा

शासकीय कार्यालयात फक्त ५ टक्के कर्मचारी काम करणार