मुंबई : राज्यात कोरोनाचा उद्रेक (Coronavirus ) पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यातील लॉकडाऊन वाढवला गेला आहे. हा लॉकडाऊन 15 मे पर्य़ंत असण्याचे संकेत सरकारकडून देण्यात आले आहेत. सध्या कोकणात येण्यासाठीही निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास बंधनकारक आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाची तपासणी केली जात आहे.
परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची अँटिजेन चाचणीही केली जात आहे. परिणामी जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची, प्रवाशांची संख्याही कमालीची कमी झाली आहे. शिवाय, कोकणात प्रवेश केल्यानंतर हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येणार आहे. तसेच 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परिणामी आता कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील कमालीची घटली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि कडक निर्बंध असल्याने कोकण रेल्वेला ( Konkan Railway) अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या चार साप्ताहिक रेल्वे तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहे. रद्द केलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 02414 एच निजामुद्दीन-मडगाव टर्मिनस राजधानी सुपरफास्ट ही साप्ताहिक गाडी 30 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 02413 एच मडगाव टर्मिनस-निजामुद्दीन सुपरफास्ट 2 मेपासून रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 02120 करमाळी-मुंबई सीएसएमटी तेजस सुपरफास्ट 28 एप्रिलपासूनच रद्द केली आहे. गाडी क्रमांक 02119 मुंबई सीएसएमटी-करमाळी तेजस सुपर फास्ट एक्सप्रेस, तसेच गाडी क्रमांक 02620 मंगळुरु-लोकमान्य टिळक टर्मिनस डेली सुपरफास्ट स्पेशल गाडी, गाडी क्रमांक 07107 मडगाव जंक्शन-मंगळूर सेंट्रल आरक्षित गाडी एक्सप्रेस विशेष गाडी आणि गाडी क्रमांक 07108 मंगळूर- मडगाव टर्मिनस राखीव विशेष गाडी 29 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. तसेच 02619 लोकमान्य टिळक टर्मिटस-मंगळुरु सेंट्रल डेली सुपरफास्ट गाडी 30 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे.