पत्नीच्या औषधांसाठी वृद्धाचा ७० किलोमीटरचा प्रवास

आपल्या पत्नीसाठी 'त्यांनी' केला तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास...

Updated: Mar 30, 2020, 02:40 PM IST
पत्नीच्या औषधांसाठी वृद्धाचा ७० किलोमीटरचा प्रवास title=

सचिन कसबे, झी मीडिया, सोलापूर : कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण जग लॉकडाऊन आहे. देशातली कोट्यवधी जनताही घरीच आहे. या संकटात अनेकांसमोर अनेक आव्हानं उभी राहतायत. सोलापूर जिल्ह्यातील एका वयोवृद्ध शेतकऱ्यासमोर असंच एक संकट उभं राहिलं. वयाची पर्वा न करता या वृद्धानं तब्बल ७० किलोमीटरचा प्रवास केला. तोही आपल्या पत्नीसाठी...

लॉकडाऊनमुळे सगळं बंद आहे. रस्ते ओस पडलेत. प्रवास ठप्प आहे. अत्यावश्यक सेवा चालू आहेत, पण घराबाहेर पडणं कठीण होऊन बसलंय. अशा कठीण काळात सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील दर्शनाळ गावात राहणारे वयोवृद्ध शेतकरी मीर अजमोद्दीन पठाण यांच्यासमोर संकट उभं राहिलं. पठाण यांच्या पत्नीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना रोज औषध-गोळ्या घ्याव्या लागतात. 

लॉकडाऊन सुरु झालं आणि नेमकी त्यांच्या पत्नीची औषधं संपली. दर्शनाळ आणि जवळच्या बाजारातील औषधांच्या दुकानात त्यांना ही औषधं मिळाली नाहीत. पत्नीला गोळ्यांची गरज होती आणि गोळ्या तर उपलब्ध नव्हत्या. काय करावं हा पेच त्यांच्यापुढे होता.

मग पठाणचाचांनी त्यांचा घोडा बाहेर काढला. घोड्यावर बसले आणि एक-दोन नव्हे तब्बल ७० किलोमीटर प्रवास करून ते थेट सोलापुरात पोहचले. पण एवढा लांबचा प्रवास करून आल्यानंतर सोलापुरातील औषधांच्या दुकानातही त्यांना औषधं मिळेनात. अनेक दुकानं ते फिरले. पण औषधं मिळेनात. मग त्यांनी पोलिसांची मदत घेतली. अखेर एका दुकानात त्यांना पत्नीच्या गोळ्या आणि औषधं मिळाली. 

सकाळी ८ वाजता घोड्यावरून निघालेल्या पठाण चाचांना औषधं मिळेपर्यंत दुपार झाली. औषधं घेऊन मग ते पुन्हा घोडेस्वारी करत घराकडे निघाले. घरी परत येईपर्यंत ३ वाजून गेले होते. पण पत्नीची औषधं मिळाल्यानं ते भर उन्हात केलेला ७० किलोमीटर प्रवासाचा ताण विसरून गेले....

पत्नीवरील प्रेमापोटी पठाण चाचांनी घोड्यावरून केलेला प्रवास चर्चेचा विषय ठरला. पण ग्रामीण भागात लॉकडाऊनमध्ये औषधांचा तुटवडा या निमित्तानं समोर आला. पुढचे काही दिवस असेच कसोटीचे असल्यानं ग्रामीण भागात औषधांचा पुरेसा पुरवठा होईल याकडे सरकारनं लक्ष द्यावं किंवा औषधांची फिरती दुकानं उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या निमित्तानं होऊ लागलीय.