कोरोनाचे संकट : ५० लाख रुपये आमदार निधीतून खर्च करण्यासाठी परवानगी

कोरोनाचे संकट : मास्क आणि सॅनिटायझरचा खर्च आमदार निधीतून करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

Updated: Mar 28, 2020, 03:41 PM IST
कोरोनाचे संकट : ५० लाख रुपये आमदार निधीतून खर्च करण्यासाठी परवानगी  title=

नाशिक : कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे  प्रत्येकाने घरीच राहण्याची खबरदारी घेण्याची आवश्यता आहे.  मास्क आणि सॅनिटायझरचा खर्च आमदार निधीतून करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी याबाबत माहिती दिली. आमदार निधीतून ५० लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य प्रशासन आणि पोलीस बाहेर पडू नका, घरीच राहा, असे आवाहन करत आहेत. आता सॅनिटायझर, मास्क, औषध फवारणी, मेडिकल सुविधा, गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आमदारांना ५० लाख रुपये आमदार निधीतून खर्च करण्यासाठी परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय 

- आमदारांना ५० लाख रुपये आमदार निधीतुन खर्च करण्यासाठी परवानगी 
- नाशिकच्या भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांची माहिती 
- जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली माहिती 
- सॅनिटायझर, मास्क, औषध फवारणी, मेडिकल सुविधा, गरजेच्या वस्तूंसाठी निधीचा वापर 

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५९ वर

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा १५९ वर गेलाय. तर संपूर्ण देशात ८०० हून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. लॉकडाऊन असले तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु राहणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तरीही नागरिक बाजारात मोठी गर्दी करताना दिसतात. सरकारकडून घरीच राहण्याचं सतत आवाहन करण्यात येतंय. मात्र नागरिक याकडे तितकंस गंभीरपणे पाहत नसल्याचं चित्र आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस घरीच राहावं. आगामी १५ ते २० दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे असून या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे आता नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडूच नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.