कोरोनाचा धोका : पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना

कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण.

Updated: May 5, 2020, 08:15 AM IST
कोरोनाचा धोका : पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेत उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने दिल्या या सूचना   title=
संग्रहित छाया

मुंबई :  उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने पुन्हा एकदा पुणे विभागाचा आढावा घेतला. यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांचीही माहिती घेतली. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, कंटेन्मेन्ट झोनमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व आवश्यकतेप्रमाणे क्वारंटाईन करण्यावर भर द्यावा, तसेच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उच्चस्तरीय केंद्रीय पथकाचे प्रमुख डॉ. ए. के. गडपाले यांनी केल्या आहेत.

विभागीय आयुक्त  कार्यालयात आरोग्य सेवेचे अतिरिक्त सल्लागार डॉ. ए. के. गडपाले यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-१९ ची वाढती संख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना यासाठी भविष्यात करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीस  महसूल उपायुक्त प्रताप जाधव, उपायुक्त डॉ.पी.बी.पाटील, आरोग्य सहायक संचालक डॉ.आर.एस. आडकेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी मायक्रोबायोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे संचालक डॉ. व्ही. एस. रंधावा, अनेस्थेशिया आणि गहन काळजी युनिटचे डॉ.अंशु गुप्ता, कम्युनिटी मेडिसीन एबीव्हीआयएमएस आणि आरएमएल हॉस्पिटलचे सहायक प्रा.डॉ. सागर बोरकर आदी उपस्थित होते.

पुणे शहरातील महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीतील झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करावे. सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना डॉ.गडपाले  यांनी यावेळी केल्या. या केंद्रीय पथकाने काल पुणे विभागातील पुणे शहराबरोबरच सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचाही आढावा घेतला.