Vijay Wadettiwar Latest News: राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यांनी एक्सवर गुंडांनी मंत्रालय परिसरात शूट केलेला व्हिडीओ शेअर केला आहे. गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. तसंच हीच का ती "मोदी की गॅरंटी"? अशी विचारणाही केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिजीओत निलेश घायवळसह काही जण मंत्रालयात फिरताना दिसत आहेत. हा व्हिडीओचा त्यांनी रिल तयार केला असून त्याला रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाचं गाणं लावलं आहे. दरम्यान रिलसाठी मंत्रालय परिसरात व्हिडीओ शूट केल्याने विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून राज्य सरकारला खडेबोल सुनावले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे असं सुनावलं आहे
"गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत," असं ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत.
गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहे.
राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात AC ची हवा घेत आहे.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर… pic.twitter.com/vjih1SkiFW
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 6, 2024
"महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्वाचे दिवस घालवत आहेत. नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आणि इकडे सरकार गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून देत आहे. हीच का ती "मोदी की गॅरंटी" ?," अशी विचारणा त्यांनी केली आहे.
दरम्यान, याआधी विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर टीका केली होती. सरकारने क्लृप्त्या लढवणं आणि घोटाळे करणं असं सुरु केलं आहे अशी टीका त्यांनी केली होती. मंत्रालयात गुंड निलेश घायवाळ रील तयार करतो सोबत त्याचे इतर गुंड देखील आहेत. हा कशी काय एवढी हिंमत करतो. मुख्यमंत्र्याना भेटायला जातो हे कसं काय शक्य होतं? गुंडांना सोबत घ्यायची वेळ मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागते, अशी टीका त्यांनी केली होती.
सध्या भ्रष्टाचाराने महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. 2 अलीबाबा आणि 80 चोर आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. अंगणवाडी सेविकांचा विषय मी समोर आणत असून मर्जीतील कंपनीला यांनी मोबाईल खरेदी करण्यासाठी कंत्राट दिलं आहे. कोट्यावधी रुपयांचे काम आहे. दिल्लीची कंपनी आहे ही. ही कुणाच्या जवळची आहे हे लक्षात घ्यायला हवं. त्या कंपनीला पैसे देण्यापेक्षा अंगणवाडी सेविकांना पैसै का दिले नाहीत. कमीशन आणि वसुली यासाठी त्यांनी हा घोटाळा केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.