'शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,' राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले 'उद्या जर त्यांनी गौतम अदानींना...'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींवरुन मोदी सरकारला घेरलं आहे. विदेशी वृत्तपत्रातील एका वृत्ताचा दाखला देत त्यांनी वीजेच्या दरात हेराफेरी केल्याचा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 18, 2023, 01:07 PM IST
'शरद पवार देशाचे पंतप्रधान नाहीत,' राहुल गांधींचं मोठं विधान; म्हणाले 'उद्या जर त्यांनी गौतम अदानींना...' title=

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उद्योगपती गौतम अदानींचा उल्लेख करत केंद्र सरकारला घेरलं आहे. राहुल गांधी यांनी यावेळी कोळशाच्या किंमतीसंबंधी 'फायनान्शिअल टाइम्स'मध्ये आलेल्या वृत्ताचा उल्लेख करत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आरोप केला की, कोळशाच्या चुकीच्या किंमती दाखवत आणि बिलात हेराफेरी करत गौतम अदानी यांनी वीजेचे दर वाढवले आहेत. जनतेच्या खिशातून 12 हजार कोटी रुपये थेट गौतम अदानी यांनी घेतल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना विचारण्यात आलं की, तुम्ही शरद पवारांना हा प्रश्न का विचारत नाही? INDIA ची आघाडी झाल्यानंतरही त्यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली होती. यावर राहुल गांधी यांनी उत्तर दिलं की, त्यांनी आतापर्यंत शरद पवार यांना कोणताच प्रश्न विचारलेला नाही. याचं कारण शरद पवार हे पंतप्रधान नाहीत. फायनान्शिअल टाइम्समधील रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, गौतम अदानी यांच्या कंपनीने कमी किंमतीत कोळसा खरेदी करत त्याची किंमत जास्त दाखवली. 

"पंतप्रधानांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह"

"शरद पवार पंतप्रधान नाहीत. शरद पवार अडानींना वाचवत नाही आहेत. त्यांना नरेंद्र मोदी वाचवत आहेत. यामुळे मी शरद पवार नाही तर पंतप्रधानांना प्रश्न विचारत आहे. जर उद्या शरद पवार पंतप्रधान झाले आणि त्यांनी गौतम अदानी यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांनाही हेच प्रश्न विचारेन," असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

"पंतप्रधानांकडून अदानींना संरक्षण"

"गरिब जेव्हा बल्ब, पंख्याचा वापर करतात तेव्हा तो सगळा पैसा गौतम अदानींच्या खिशात जातो. देशाचे पंतप्रधान गौतम अदानींचं रक्षण करत आहेत. लोकांनी कोणताही स्विच दाबला तर तो पैसा थेट अदानींच्या खिशात जातो," असं राहुल गांधी म्हणाले. गौतम अदानी कोळशाच्या खरेदी-विक्रीमध्ये ओव्हर इनव्हॉइसिंग करत आहेत. 

हे थेटपणे वीजचोरीचं प्रकरण असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी केंद्र सरकारला विचारणा केली की, गौतम अदानी यांच्यात नेमकं असं काय आहे जे सरकार त्यांची कोणतीच चौकशी करु शकत नाही. त्यांना कोणतेही प्रश्न विचारले जात नाहीत. यामागे कोणती शक्ती आहे, हे संपर्ण देशाला जाणून घ्यायचं आहे असं राहुल गांधी म्हणाले आहेत. 

शरद पवार-गौतम अदानी यांच्या भेटीमुळे रंगली होती चर्चा

शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापलं होतं. अहमदाबाद येथे ही भेट झाली होती. ज्यावरुन भाजपाने काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. यासह राहुल गांधींनाही लक्ष्य करण्यात आलं होतं. कारण ते वारंवार भाजपा आणि अदानी यांच्यात जवळीक असल्याचा आरोप करत असतात. 

जयंत पाटील यांनी या भेटीवर स्पष्टीकरण दिलं होतं. हा फक्त उद्घाटनाचा कार्यक्रम असून ते एकमेकांना ओळखतात. त्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही असं ते म्हणाले होते.