'शेतकरी' आंदोलनात काँग्रेसनं भाजीपाला फेकला रस्त्यावर, भाजपची गांधीगिरी!

कर्जमाफीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात पसरलेल्या शेतकरी आंदोलनाचे लोण आज नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात पोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात आज काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनाला भाजपने प्रति-आंदोलन करत उत्तर दिले. आंदोलना दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला... तर तो साफ करत भाजप कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली.   

Updated: Jun 9, 2017, 09:35 PM IST
'शेतकरी' आंदोलनात काँग्रेसनं भाजीपाला फेकला रस्त्यावर, भाजपची गांधीगिरी! title=

अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर : कर्जमाफीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात पसरलेल्या शेतकरी आंदोलनाचे लोण आज नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात पोचले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात आज काँग्रेसने आंदोलन केले. या आंदोलनाला भाजपने प्रति-आंदोलन करत उत्तर दिले. आंदोलना दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला... तर तो साफ करत भाजप कार्यकर्त्यांनी गांधीगिरी केली.   

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून या दोन्ही पक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरच राजकीय आखाडा मांडला. कर्जमाफीची घोषणा झाली असली तरीही अमंलबजावणी कशी होणार? याबद्दल सरकारने काहीही सांगितलं नसल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर भाजीपाला फेकला. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळाकरता धक्काबुक्की देखील झाली.

काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर देण्याकरता भाजपने प्रति-आंदोलन केलं. ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस नेत्यांचं आंदोलन म्हणजे 'राजकीय नाटक' असल्याची टीका भाजप नेत्यांनी केली. आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर फेकलेला भाजीपाला भाजप नेत्यांनी वेचला. 

आजच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून पोलिसांतर्फे मोठा फौज-फाटा तैनात होता. कर्जमाफीची अंमलबजावणी करता आपण 'अल्टिमेटम' देत असून त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं काँग्रेसने जाहीर केलंय.