"मातोश्रीवर कळाल्यानंतर फासे उलटे पडले आणि..."; मुख्यमंत्र्यांबाबत चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

अशोक चव्हाण यांच्या दाव्यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी गौप्यस्फोट केलाय

Updated: Sep 29, 2022, 02:23 PM IST
"मातोश्रीवर कळाल्यानंतर फासे उलटे पडले आणि..."; मुख्यमंत्र्यांबाबत चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट title=

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : काँग्रेस (congress) नेते अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  2014 मध्येच आमच्याकडे प्रस्ताव घेऊन आल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. यालाच आता शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी याला दुजोरा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दहा ते पंधरा आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा गोप्यस्फोट केलाय. 

आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांनीच मला याबद्दल सांगितले होते असेही चंद्रकांत खैरे म्हणाले. खैरे यांच्या दाव्याने  पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जर काँग्रेस (congress) आणि राष्ट्रवादी (NCP) सोबत घेण्याचा त्यांना पटत नव्हतं तर त्यांनी अडीच वर्षे सत्ता का भोगली ? असा सवालही चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी उपस्थित केला. (CM Eknath Shinde was going to join congress says Shiv Sena leader Chandrakant Khaire)

"त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना सत्ता हवी होती त्यामुळे खूप उतावळेपणा चालू होता. म्हणून ते काही आमदार घेऊन गेले होते. कॉंग्रेसमध्ये जाऊन सत्ता मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण मातोश्रीला हे कळाल्यानंतर फासे उलटे पडले आणि त्यांना परत यावं लागलं. आता तेच काम त्यांनी इथे केलं आहे. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत अडीच वर्षे सत्तेत होते. त्यांनी त्याच वेळी राजीनामा द्यायला हवा होता. राजीनामा त्यांनी दिला नाही आता बडबड करत आहेत," असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

काय म्हणाले होते अशोक चव्हाण?

"2014 पासून शिवसेना-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले. परंतु 2014 मध्ये ज्यावेळी भाजप-शिवसेनेमध्ये वाद सुरु होते, त्यावेळीच शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे यांचा समावेश होता. त्यावेळी आपण या प्रस्तावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सुचवले होते. त्यांची संमती असेल तर आमच्या पक्षातर्फे तुमच्या प्रस्तावाचा विचार करू, असे सांगितले होते. त्यावेळी माझ्या चर्चगेट येथील कार्यालयात शिवसेनेचं शिष्टमंडळ भेटले होते," असे अशोक चव्हाण म्हणाले.