पोलिसांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मालेगावातील पोलिस वसाहतीच उद्घाटन पार पडलं.

Updated: Jul 30, 2022, 11:29 AM IST
पोलिसांना वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा  title=

मुंबई : राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलीस 24 तास झटत असतात. त्यामुळे पोलिसांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी घरे निर्माण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मालेगावातील पोलिस वसाहतीच उद्घाटन पार पडलं. यानिमित्त उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांना घरच टेन्शन असू नये हा प्रयत्न राहील. मालेगावात चांगली वसाहत निर्माण झाली आहे. त्याप्रमाणेच आता राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांसाठी घरे निर्माण करणार आहोत असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

पोलीस बांधव कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी सण, ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता 24 तास रस्त्यावर झटत असतो. त्यामुळे त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. 
दरम्यान त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुंबईतही एक बैठक नुकतीच पार पडल्याची त्यांनी माहिती दिली. यात मुंबईत 50 हजार पोलीसांच्या तुलनेत केवळ 19 हजार घरेचं उपलब्ध असल्याची माहीती मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निवासी घरे तयार करायच्या आहेत आणि जुन्या वसाहती दुरुस्त करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मत नोंदवले.