अहमदनगर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडीद खरेदी प्रश्नाबाबत शेतक-यांना दिलासा दिलाय. ज्या शेतक-यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे त्या शेतकर्यांची उडीद खरेदी शासन करेल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी अहमदनगरमध्ये केली.
जामखेड तालुक्यातील हळगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. या महाविद्यालयाच्या ईमारत बांधकामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या भूमीपूजन समारंभासाठी पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उडीद खरेदी प्रश्नाबाबत सरकारचे धोरण स्पष्ट केलं. प्रत्येक शेतक-याची उडीद खरेदी होईपर्यंत उडीद खरेदी केंद्र सुरु ठेवणार, असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या कापुस उत्पादक शेतक-यांना हेक्टरी ३० हजार रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. नांदेडच्या कंधार येथे आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना ६,८०० रुपये एनडीआरएफकडून, ८ हजार रुपये विम्यातून आणि १६ हजार रुपये कंपन्यांकडून वसूल करून असे हेक्टरी ३० हजार रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.