कोकणातलं चिपी विमानतळ अजूनही प्रतिक्षेत

कोकणातलं चिपी विमानतळ कधी सुरु होणार?

Updated: Jan 19, 2020, 06:50 PM IST
कोकणातलं चिपी विमानतळ अजूनही प्रतिक्षेत title=
संग्रहित फोटो

विकास गावकर, झी मीडिया, सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुचर्चित चिपी विमानतळसाठी लागणाऱ्या परवानग्या अजूनही न मिळाल्याने कोकणातील चाकरमान्यांची विमान प्रवासाची प्रतीक्षा अजून काही संपण्याची चिन्हे नाहीत. 

सत्य नव्हे तर स्वप्न अशीच काहीशी अवस्था कोकणातील चिपी विमानतळाची झाली आहे. कारण या विमानतळाचा वापर केवळ निवडणुकीत आश्वासन देण्यासाठीच होत आला आहे. २०१८ मध्ये गणेशोत्सव काळात मोठा गाजावाजा करुन चिपी विमानतळावर विमान उतरवण्यात आलं होतं. त्यावेळी येत्या सहा महिन्यात सर्व चाचण्या पूर्ण करून विमानतळ प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र आता या घटनेला अडीच वर्षाहून अधिक काळ होत आला तरी, विमान काही उतरण्याचं नाव घेत नाही.

सद्यःस्थितीचा विचार करता केंद्रात भाजपच तर राज्यात शिवसेनेच सरकार आहे. त्यामुळे या दोघांमध्ये ताळमेळ झाला तरच इथं विमान उतरू शकत. अन्यथा आणखी किती वर्ष जातील हे सांगता येत नाही.

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या एप्रिल-मे महिन्यात आणि गणेशोत्सव काळात मोठी असते. आता लवकरच उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील सहाजिकच पुन्हा एकदा चाकरमानी विमानाची प्रतीक्षा करतील. या वर्षी तरी एप्रिल - मेमध्ये प्रवास विमानाने करता यावा अशी अपेक्षा चाकरमानी व्यक्त करत आहेत.