Chichwad By Election : चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadhi) बंडखोरीचं ग्रहण लागलंय. राष्ट्रवादीनं (NCP) नाना काटेंना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाना काटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मविआने मोठं शक्तीप्रदर्श केलं. पण नाना काटेंना उमेदवारी दिल्याने राहुल कलाटे नाराज झाले आहेत. ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. चिंचवडमधून अपक्ष लढण्यावर राहुल कलाटे ठाम आहेत. इतकंच नाही तर मोठी रॅली काढून समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज ते दाखल करणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके राहुल कलाटेंची मनधरणी करतायत. आता राहुल कलाटे नेमका काय निर्णय घेतात त्याकडे लक्ष लागलंय.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच लढणार यावर कालच शिक्कामोर्तब झालं. पण काल राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला नव्हता. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करून नाना काटे यांची उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप विरूद्ध राष्ट्रवादीचे नाना काटे असा सामना होणार आहे. चिंचवडमधून काल भाजपतर्फे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी फॉर्म भरला आहे.
काटे-कलाटे आमनेसामने
दरम्यान, चिंचवडमध्ये नाना काटे आणि राहुल कलाटे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. राष्ट्रवादीकडून नाना काटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अजित पवार देखील उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नाना काटे आणि अजित पवार बाहेर आले. त्यावेळी राहुल कलाटे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले. त्यावेळी काटे आणि कलाटेंचे कार्यकर्ते समोरासमोर आले.
कसबा पोटनिवडणुकीतही मविआची अडचण
दरम्यान, पुण्यात कसबापेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी झालीय. पुणे शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब दाभेकर आज कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्याआधी ते बाईक रॅली काढत शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
कोट्यधीश उमेदवार
कसबा पेठ पोटनिवडणुकीत कोट्यधीशांचा सामना रंगणार आहे. भाजपचे हेमंत रासने हे 17 कोटींचे मालक आहेत. तर काँग्रेसच्या धंगेकरांची संपत्ती 10 कोटी एवढी आहे. विशेष म्हणजे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातले हे दोन्ही उमेदवार पदवीधरही नाहीत.