Maharashtra Assembly Winter Session 2022 : ऐन थंडीत राज्याचं राजकारण चांगलच तापलं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister eknath shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची संयुक्त पत्रकारपरिषद पार पडली. या पत्रकार परिषेदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar )यांच्यावर निशाणा साधला. अजितदादांच्या तोंडी खोक्यांची भाषा शोभत नसून राज्याचं लवासा करायचं नाही असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्न, विदर्भाचा अनुशेष, मुंबईतला मविआचा महामोर्चा अशा अनेक विषयांवरुन शिंदे-फडणवीसांनी विरोधकांवर तोफ डागली. राज्यात लवकरच लोकायुक्त कायदा लागू होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तर मुख्यमंत्री शिंदेंनी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. अजितदादांच्या तोंडी खोक्यांची भाषा शोभत नाही, राज्याचा लवासा करायचा नाही अशी टीका शिंदेंनी केली.
कोविडचं कारण देऊन मागच्या सरकारनं विदर्भातील अधिवेशन टाळलं होतं हे अजित पवारांना देखील माहित आहे. हे खोके सरकार आहे. हे स्थगिती सरकार आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे असे अजित पवार म्हणाले होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार, कायदेशीररीत्या बहुमताच्या आधारावर हे सरकार स्थापन झालेलं आहे. सभागृहात बहुमत सिद्ध करून हे सरकार स्थापन झालं आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
2019 ला राज्यात जे सरकार स्थापन झाल ते अनैतिक सरकार होतं. सोयरीक एकाशी केली आणि संसार दुसऱ्याशी थाटला. हे सर्वांना माहीत आहे. हे खोके सरकार आहे, अशी टीका अजित पवार करतात. पण, खोक्याची भाषा अजितदादा यांना शोभणारी नाही. खोक्यांचा जर एकावर एक ढिग रचला तर खूप उंच होईल. नजर पोहचणार नाही शिखर इतकं उंच शिखर होईल आणि शेवटी त्याचा कडेलोट होईल असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.