Chhatrapati Shivaji Maharaj Award: किल्ले शिवनेरीवर आज शासकीय शिवजयंती साजरी होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यासाठी किल्ले शिवनेरीवर दाखल झाले आहेत. पाळना गीत गात शिवजन्मोत्सव सोहळा सुरू झाला. राज्याचे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सहकार मंत्र्याच्या उपस्थित सोहळा संपन्न
झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पोलिस महासंचालक डॉ. दिलीप भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवनेरी भुषण पुरस्कार ब्रिगिडीयर अनिल काकडे यांना प्रदान करण्यात आला. शिवनेरी भूषण डॉ. अरुण साबळे यांना देण्यात आला आहे. मराठा सेवा संघाकडून हा पुरस्कार दिला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
दरम्यान मराठा सेवा संघाच्या व्यासपिठावरुन उपमुख्यमंत्री, खासदारांनी जनतेला संबोधित केले आहे. कुठल्याही परिस्थीतीत इथे निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच मधल्या काळात निसर्गचक्री वादळात हिरडा पिकाचं नुकसान झालं. त्याचे पंचनामे झाले पण मदत मिळाली नाही. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की 15 कोटी रूपयांचीच मदत आहे पण ती करावी, असे अजित पवार यावेळी म्हणाले. शिवरायांचा विचार हा एकतेचा विचार सर्वांना सोबत घेऊन जाणारा विचार सर्व जातिधर्माला सोबत घेऊन जाणारा विचार असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.
शिवछत्रपती हे आधुनिक विद्वान होते. महाराजांचा सर्व समावेशक कारभार होता. प्रजेच्या सुखासाठी स्व:ताचे सुख पाहिले नाही. आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांचा एक गुण तरी अंगीकारायला हवा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे युग प्रवर्तक आहेत. शिवरायांनी स्वातंत्र्य, स्वधर्म काय असतं हे आपल्याला शिकवलं. अनेक राजांचे राजवाडे मुघलांचे मांडलिक होण्यास तयार असताना छत्रपतींनी जिजाऊंच्या आशीर्वादाने, मावळ्यांना एकत्र घेऊन मुघलांना लढा दिला. अन्याय करणाऱ्यांना तुम्ही निश्चितपणे पराभूत करु शकता, हे दाखवून दिलं. 350 वर्षे महाराजांच्या राज्याभिषेकाला झाली आहेत. सुर्य आणि चंद्र असेपर्यंत छत्रपतींचा जयजयकार भारतभूमीत होत राहील, असे फडणवीस यावेळी म्हणाले.