विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या हिमायतबागेजवळ रात्री पट्टेदार तरस (Hyenas) दिसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. प्रामुख्याने जंगलात आढळणारा हा प्राणी शहराच्या आत आल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक रहिवांशी या प्राण्याचे व्हिडीओ काढले होते. त्यानंतर रविवारी सकाळीपासून सोशल मीडियावर हे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हिमायत बाग परिसरात रात्री अचानक काही लोकांना तरस हा प्राणी आढळून आला. लोकांनी त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. त्यानंतर हे व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. मात्र हा तरस नेमका कुठून आला आणि कुठे गेला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुसरीकडे प्रोढ अशा तरसामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिमायतबागपासून 10-15 फूट अंतरावर कुंपणाच्या आतल्या भागातून हर्सूल चौकाकडे तरसाला धावताना लोकांनी सर्वात आधी पाहिले. कुंपणातून पुढे जाऊन तो मागे फिरला. त्यानंतर तो रस्ता ओलांडून सलीम अली तलावाकडे गेला. त्यानंतर तरसाने पुन्हा आपला मार्ग बदलला आणि तो किला-ए-आर्ककडे जाण्यापूर्वी दिल्ली गेटच्या दिशेने वेगाने पळू लागला, असे तिथल्या एका नागिरकाने सांगितले. त्यानंतर तितल्या एका मशिदीच्या एका इमामाने शुक्रवारी रात्री हिमायत बागेच्या सीमेला लागून असलेल्या किला-ए-आर्क जवळच्या भागाकडे तरस जाताना पाहिले. त्यानंतर कोणालाही ते सापडले नाही, असेही म्हटलं जात आहे.
छत्रपती संभाजीनगरचे मानद वन्यजीव वॉर्डन किशोर पाठक यांनी या सगळ्या प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हिमायतबागेच्या मागील बाजूस प्रवेश केल्यानंतर तरस शहरी भागात भटकला असावा. तरस मानवी वस्तींपासून सावध राहतात. रस्ते बांधणी आणि मानवनिर्मित कृतींमुळे तसेच शिकार कमी झाल्यामुळे वन्य प्राण्यांच्या मानवी भागात भटकण्याच्या घटना घडत आहेत, असे किशोर पाठक म्हणाले.