विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयातील अपघात विभागात तरुणाचे दोन गट आपसात भिडल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या दोन गटांपैकी एका तरुणाच्या हातातील रॉडचा वार महिला निवासी डॉक्टरच्या डोक्यात बसला. त्यात महिला डॉक्टरला जबर मार लागला असून त्यांना उपचारासाठी वॉर्डात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी गुन्हा तात्काळ बेगमपुरा पोलिस ठाण्यांत उशीरा गुन्हा दाखल केल्यानंतर निवासी डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाच्या बाहेर दोन गटांमध्ये तुफान रडा झाला होता. या राड्यामध्ये जखमी तरुणाला घाटी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जखमी तरुणावर उपचार सुरू असताना दुसऱ्या गटातील काही तरुण उपचार सुरु असलेल्या वॉर्डात गेले. त्यावेळी जखमी तरुणाने शेजारी असलेल्या बेडवरच्या रुग्णाकडे बोट दाखवलं. त्यानंतर त्या तरुणांनी थेट त्या व्यक्तीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी एका तरुणाने थेट रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र हा रॉड कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना लागला. त्यामुळे महिला डॉक्टर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
छत्रपती संभाजी नगरातील घाटी रुग्णालयात, दोन गट आपापसात भिडल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. याप्रकरणी कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. घाटीतील पाच सुरक्षारक्षकांचे निलंबन देखील करण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया घाटी अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी दिले आहे. तर जखमी डॉक्टर याही पुढे आल्या आहे.
काही हुल्लडबाज तरुणांनी डोळ्या शेजारी जखम झालेल्या रुग्णावर उपचार सुरू असताना काही तरुणांनी अपघात विभागात प्रवेश करत एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली, शेजारीच मी उभी असल्यामुळे त्यांच्या राड्यात मला पाठीमागून डोक्याला जोरात रोड लागला, त्यामुळे दहा पंधरा मिनिटे मला काही सुधारले नाही अशी प्रतिक्रिया जखमी डॉक्टर पृथ्वी भोगे यांनी दिली आहे.
या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नाही - सुप्रिया सुळे
या घटनेनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे. "छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घुसून एका टोळक्याने निवासी डॉक्टरांना रॉडने मारहाण केल्याची घटना घडली. हि अतिशय गंभीर बाब आहे. रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स देखील सुरक्षित नसतील तर रुग्णसेवा सक्षम कशी राहिल? मूळात या राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नाही. त्यामुळे हे प्रकार घडत असून कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. शासनाने या प्रकरणी सखोल चौकशी करुन हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे," असे सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.