बाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात... छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एका अज्ञात वाहनाने चिरडल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 31, 2023, 10:31 AM IST
बाईकच्या अपघातातून वाचले अन् तितक्यात... छत्रपती संभाजीनगरमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर :  वाळुज एमआयडीसीमध्ये आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकच्या धडकेनंतर खाली पडलेल्या चौघांना एका अज्ञात वाहनाने चिरडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केला. तर अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्यावर दोन बाईकचा अपघात झाला होता. या अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या चौघांपैकी तिघांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात आकाश शिवाजी कांबळे, कैलास एकनाथ कांबळे, प्रताप साळुबा बनसोडे हे जागीच ठार झाले आहेत.  तर शंकर लक्ष्मण थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अपघातात मृत पावलेले कैलास आणि आकाश हे दोघेही सख्खे चुलते-पुतणे होते. 

करमाड-पिंप्रीराजा मार्गावर मंगरूळ फाट्यावर या दोन बाईक एकमेकांना धडकल्या होत्या. धडक बसल्यानंतर बाईकवरील चौघेही खाली रस्त्यावर पडले. मात्र याचवेळी या मार्गावरून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने आकाश, कैलास आणि प्रताप या तिघांना चिरडले. तर या अपघाता शंकर थोरात हे जखमी झाले. यानंतर घटनास्थळी मदत करण्यासाठी थांबता अपघातानंतर वाहनचालक सुसाट निघून गेला आहे. या घटनेची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

कारखान्यात लागलेल्या आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघाताची मोठी घटना घडली. वाळुज एमआयडीसीतील हातमोजे तयार करणाऱ्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मोठ्या प्रयत्नाने कारखान्यातील आग विझवली. पहाटे 2.15 च्या सुमारास कारखान्याला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. कारखान्याच्या आतून सहा जणांचे मृतदेह सापडले आहेत.

स्थानिकांनी दावा केला होता की, किमान पाच कामगार इमारतीत अडकले आहेत. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नंतर आगीच्या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. कामगारांनी सांगितले की, आग लागली तेव्हा कंपनी बंद होती आणि ते झोपले होते.