रत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर

Raigad News : रत्नागिरीपाठोपाठ रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवरही चरस या अमली पदार्थाचा साठा सापडल्याचे समोर आलं आहे. श्रीवर्धननंतर हरीहरेश्वर भागातही चरसची पाकिटे सापडली होती. त्यामुळे पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. 

आकाश नेटके | Updated: Aug 30, 2023, 07:36 AM IST
रत्नागिरी, रायगड अन् आता श्रीवर्धन; कोकण किनारपट्टीवर चरस कुठून येतंय? धक्कादायक माहिती समोर title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : कोकण (Kokan) किनारपट्टीवर चरसची (Charas) पाकिटे सापडण्याचे सत्र सुरूच असल्याचे समोर आलं आहे. मंगळवारी दिवेआगर, भरडखोल किनारी तब्बल 21 पाकिटे सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिासांनी रायगड, श्रीवर्धन किनाऱ्यांवरुन तीन दिवसात चरसची 82 पाकिटे जप्त केली आहेत. जप्त मालाची किंमत चार कोटींच्या वर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रायगड पोलिसांकडून (Raigad Police) या पार्श्वभूमीवर शोध मोहीम सुरू आहे.

कोकण किनारपटटीवर चरसची पाकिटे सापडण्याचे प्रकरण सुरु असताना श्रीवर्धन तालुक्‍यातील वेगवेगळया किनाऱ्यांवर आतापर्यंत 107 पाकिटे सापडली आहेत. पाकिटांचे वजन आणि पंचनाम्‍याचे काम अद्यापही सुरू आहेत. सापडलेल्‍या मालाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रूपये असल्याचे समोर आले आहे. रायगड पोलिसांकडून श्रीवर्धनच्‍या किनारपटटीवर अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलीस ठाण्‍यात अज्ञात व्‍यक्‍तीविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. समुद्र किनाऱ्यांवर आणखी पाकिटे सापडण्‍याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अशी पाकिटे आढळल्‍यास पोलीसांना माहिती द्यावी, पाकिटे लपवून ठेवणाऱ्यां विरोधात गुन्‍हा नोंदवून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली आहे.

सापडलेल्या चरसच्या पाकिटांवर अफगाण प्रोडक्ट छापले गेले आहे. आम्ही प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. किनार्‍यावर कोणाला अशीच पाकिटे आढळल्यास त्यांनी त्वरित कळवावे. वैयक्तिक किंवा व्यावसायिक वापरासाठी ठेवल्याचे आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी सांगितले.

आम्हाला शंका आहे की चरस वाहून नेणारे जहाज एकतर बुडाले असेल किंवा तपासणीदरम्यान ते समुद्रात टाकले असावे. ही पाकिटे किनार्‍यावर केव्हा आली असतील याचा अंदाज बांधणे कठीण आहे कारण ती किनार्‍यावर जमा झालेल्या टाकाऊ पदार्थात सापडली आहेत. रत्नागिरी येथेही अशीच पाकिटे आढळून आली आहेत. प्लॅस्टिक पॅकिंगमुळे आतील पावडर व्यवस्थित आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

कुठे किती पाकीटे सापडली?

जीवना बंदर  - 9 पाकिटे, मारळ बीच – 30 पाकिटे, सर्वे बीच – 24 पाकिटे, कोंडीवली बीच – 11 पाकिटे, दिवेआगर बीच – 33 पाकिटे

एकूण – 107 पाकिटे

आतापर्यंत कुठे सापडली चरसची पाकिटे?

27 ऑगस्ट -  श्रीवर्धन जीवना बंदर 9 बॅग - 10 किलो 300 ग्राम

28 ऑगस्ट - हरीहरेश्वर, मारळ किनारा 30 बॅग 35 किलो

28 ऑगस्ट रात्री - सर्वे किनारा 24 बॅग, 24 किलो 551 ग्राम

एकूण बॅग - 61

एकूण किंमत अंदाजे 3 कोटी रुपये