पुणे : पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे दिलासा मिळाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात आज पाऊस बरसला. अकोले भंडारदरा परीसरात देखील पावसाला सुरवात झाली आहे.
पंढरपुरात देखील पावसाने हजेरी लावली आहे. पंढरपुरात हलक्या सरी कोसळत आहेत. तर जालना जिल्ह्यातील बदनापूर, भोकरदन, जाफराबादसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला.
वर्धा जिल्ह्याच्या काही भागात ही पावसाच्या सरी कोसळल्या. 1 तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली.
दुसरीकडे जोरदार वादळी वारा व पावसामुळे मालेगावच्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील चाळीसगाव फाट्यावर असलेला एकता दर्शनी भागातील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सुदैवाने लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. पाऊस आल्याने काही जण हॉटेल दर्शनी भागातील छताखाली उभे असतांना ही घटना घडली.
चंद्रपूर जिल्ह्यात आज या मौसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आजचे कमाल तापमान 46.2 इतके होते. तर ब्रम्हपुरीमध्ये 45.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.