अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; एका वर्षासाठी केले तडीपार

अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी भाजप नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच कारवाई झालेल्या व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश केला होता

Updated: Jan 28, 2023, 05:22 PM IST
अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; एका वर्षासाठी केले तडीपार title=

Amruta Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल भाजप नेत्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. खेमदेव गरपल्लीवार (Khemdev Garpalliwar) असं या व्यक्तीचं नाव आहे. चंद्रपूर (Chandrapur) पोलिसांनी खेमदेव गरपल्लीवार याला वर्षभरासाठी तडीपार केलं आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी खेमदेव गरपल्लीवार याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी शहरात हा प्रकार घडला आहे.

नेमकं काय झालं?

खेमदेव गरपल्लीवार याने काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. अमृता फडणवीस यांनी त्यांचे एक पंजाबी गाणे प्रदर्शित झाल्यानंतर वेश्या व्यवसायावर मत मांडलं होतं. त्यावर गरपल्लीवार याने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती.  गरपल्लीवार याच्या पोस्टमुळे स्थानिक भाजप कार्यकर्ते नाराज झाले होते. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती. त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गरपल्लीवार याला एका वर्षासाठी चंद्रपूरमधून तडीपार करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृता फडणवीस यांच्यावर सामाजिक माध्यमातून जातीय तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य खेमचंद किसनराव गरपल्लीवार (वय 49) रा. तुकडोजीनगर, गोंडपिपरी ता. गोंडपिपरी याने केले होते. त्याबाबत पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर आता तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

कोण आहेत खेमचंद गरपल्लीवार?

गरपल्लीवार हे गोंडपिंपरी नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेविका शारदा गरपल्लीवार यांचे पती आहेत. गरपल्लीवार याच्यावर गोंडपिंपरी पोलीस  ठाण्यामध्ये अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अश्लील शिवीगाळ करून लोकांना धमकावणे, जमिनी बळकावणे, लोकांची फसवणूक करणे, विनयभंग असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद गरपल्लीवार याच्यावर आहेत.

दरम्यान, खेमदेव गरपल्लीवार गोंडपिपरी परिसरात दादागिरी करून लोकांमध्ये दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी खेमदेव याच्या तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्याच प्रस्तावावर निर्णय घेऊन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी खेमदेव गरपल्लीवार याला एक वर्षासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.