Chandrapur dead leopard : चंद्रपूर जिल्ह्यात रेल्वे मालगाडीच्या इंजिनावर बिबट्याचा (leopard) मृतदेह आढळला. घुग्घुस येथील न्यू रेल्वे कोल सायडिंग येथे हा प्रकार उघडकीस आली आहे. आज सकाळी ही मालगाडी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनमधून कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनाच्यावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. चंद्रपूर थर्मल पावर स्टेशन परिसरात मोठया प्रमाणात वन्यजीवांचा वावर असतो. त्यामुळे मालगाडीच्यावर चढलेल्या बिबट्याला अतिउच्च पॉवर इलेक्ट्रिक ताराचा स्पर्श झाला असावा आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. वनविभाग आणि रेल्वे प्रशासन या घटनेचा तपास करत आहेत.
दरम्यान, ही मालगाडी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातून कोल सायडिंगमध्ये दाखल झाली. त्यावेळी इंजिनच्या वर बिबट्या मृतावस्थेत दिसल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. त्यांनी तात्काळ वनविभागाला कळवून याची माहिती दिली. आज सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ( Leopard Death) वनाधिकारी यांना माहिती मिळताच वनविभागचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी मृतावस्थेत असलेल्या बिबट्याला खाली काढले. त्याची तपासणी केली. मात्र, अधिक माहिती देण्यात आलेली नाही. वनअधिकाऱ्यांनी या पंचनामा केला आहे. त्याला आपल्या ताब्यात घेतले आहे.
तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वरवट परिसरातील जंगलात वाघाचा मृतदेह आढळला होता. वाघाचा मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेत होता. मृत्यू अंदाजे 8 ते 10 दिवस आधी झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच परिसरापासून जवळ असलेल्या निंबाळा परिसरात एक आठवड्यापूर्वी एका वाघाचा झुंजीत झाला होता मृत्यू, त्यामुळे आज मृतावस्थेत सापडलेला वाघ त्या झुंजीत जखमी होऊन दगावल्याची प्राथमिक शंका, वाघाचा मृतदेह सध्या चंद्रपूर येथील उपचार केंद्रात नेण्यात आला. त्यानंतर त्याचं पोस्ट मॉर्टम करण्यात आले.
याआधी वाघ आणि बिबट्या यांच्यामध्ये झुंजेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मरेगाव बिट येथे उघडकीस आली होती. वनाधिकाऱ्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर मृतदेहाला अग्नी दिला. दिवसागणिक वाघ आणि बिबट्या यांच्यातील झुंजीचे प्रमाण वाढले आहे. त्यामध्ये बिबट्याचा मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडत असल्याचे दिसून येत आहे. ताडोबा वगळता अन्य जंगलात असलेल्या पट्टेदार वाघांमुळे बिबट्याच्या जिवीतास धोका होत आहे.