चंद्रपूरात आजपासून मतदान, उमेदवाराच्या गाडीवर हल्ला

 या गंभीर घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

Updated: Dec 9, 2018, 10:34 AM IST
चंद्रपूरात आजपासून मतदान, उमेदवाराच्या गाडीवर हल्ला  title=

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०१८ साठी आज मतदान होत आहे. निवडणुका जवळ आल्याकी राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी उडतात. पण इथल्या नगर परिषद निवडणूकीत गंभीर प्रकार समोर आलाय. निवडणूक प्रचारासाठी गेलेल्या आणि नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवार रश्मी पेशने-खानोरकर यांच्या गाडीवर बोंडगावजवळ अज्ञातांनी कुदळ, पावडयांनी हल्ला केला. यात त्यांच्या गाडीचं नुकसान झालंय. हा हल्ला करण्यामागचा हल्लेखोरांचा हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी या गंभीर घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे. पोलीस या अज्ञातांचा शोध घेत आहेत. 

शोध सुरू 

जनशक्ती पक्षाच्या उमेदवार रश्मी पेशने-खानोरकर या आपल्या गाडीने निवडणूक प्रचारासाठी जात असताना समोरुन आलेल्या अज्ञातांनी गाडीवर अचानक हल्ला चढवला.

नक्की काय प्रकार सुरू आहे हे सुरूवातीला त्यांच्या लक्षात आला नाही. पण हल्लेखोर कुदळ, पावडे घेऊन तयारीत आले होते.

सुदैवाने या  हल्ल्यातून त्या सुखरूप बचावल्या असून त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही मात्र या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजलीये.

या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला कोणी केला याबबत पोलीस शोध घेत आहेत.

झालेला हल्ला वैयक्तिक रागाने की राजकीय सुडबुद्धीने झालाय? याबाबतही पोलीस चौकशी करत आहेत.