बर्थ डे आहे रेड्याचा... 1500 किलोचा 'गजेंद्र' अन् एक किलोचा केक! या Birthday Celebration ची राज्यभर चर्चा

Sangli News : या रेड्याच्या वाढदिवासाची सांगलीसह संपूर्ण राज्यात चर्चा सुरु झालीय. पाच वर्षाचा गजेंद्र नावाचा हा रेडा तब्बल दीड टन म्हणजेच 1500 किलोंचा आहे. शिवार कृषी प्रदर्शनात वाढदिवसानिमित्त महिलांनी त्याला ओवाळत त्याचासाठी केकही कापला आहे

Updated: Jan 21, 2023, 11:14 AM IST
बर्थ डे आहे रेड्याचा... 1500 किलोचा 'गजेंद्र' अन् एक किलोचा केक! या Birthday Celebration ची राज्यभर चर्चा title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : प्रत्येकालाच आपला वाढदिवस (Birthday Celebration) खास व्हावा असं वाटतं. पण अशीही काही लोक आहेत जी आपल्या पाळीव प्राण्यांना जीवापेक्षा जास्त जपतात आणि अगदी दिलखुलासपणे त्यांचेही वाढदिवस साजरा करत असतात. असे वाढदिवस नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. सांगलीतल्या (Sangli) एका रेड्याच्या (Bull Birthday) वाढदिवसाचीही अशीच चर्चा सुरु आहे. सांगलीत एका व्यक्तीने त्याच्या रेड्याचा चक्क पाचवा वाढदिवस साजरा केला आहे.

सांगलीच्या इस्लामपुरात तब्बल दीड टन रेड्याचा पाचवा वाढदिवस साजरा झालाय. आपल्या वजनाने आणि किमतीने हा रेडा इस्लामपुरात भरलेल्या शिवार कृषी प्रदर्शनात आकर्षणाचा विषय ठरतोय. मंगसूली येथील विलास नाईक यांचा गजेंद्र नावाचा रेडा पाच वर्षाचा झाला आहे. शुक्रवारी गजेंद्रचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. दीड टन वजनाच्या गजेंद्रची किंमत 50 लाख रुपये आहे. शिवार कृषी प्रदर्शनात आलेल्या गजेंद्रने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

दरम्यान, प्रदर्शनाचे आयोजक आणि स्वाभिमानीचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी गजेंद्रचा वाढदिवस उस्ताहात साजरा केला. यावेळी महिलांनी गजेंद्र नावाच्या रेड्याला ओवाळले. अगदी एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस साजरा करावा असा हा वाढदिवस साजरा करण्यात आलेल्या सर्वांसाठी हा कुतूहलाचा विषय बनला आहे.

दरम्यान, याआधीही औरंगाबादमध्ये एका रेड्याच्या वाढदिवसाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले होते. सूरज नावाच्या रेड्याचा वाढदिवसानिमित्त शहरभर होर्डिंग लावण्यात आले होते. तर 700 पाहुण्यांना जेवणाचे आमंत्रण देण्यात आले होते. औरंगाबाद शहरातील शंकरलाल पहाडिया यांच्याकडे नागपूर हेटी प्रजातीचा सुरज नावाचा हा रेडा आहे. सुरज दोन वर्षांचा झाल्यानंतर पहाडिया यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला आहे.