सांगली : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फूटेज डिलीट करण्यात आलं. याप्रकरणी सीआयडीनं एकाला ताब्यात घेतलं आहे. अनिकेतला पोलीस कोठडीत मारहाण करतानाच्या वेळचे सीसीटीव्ही फूटेज डिलीट करण्यात आलं होतं.
दरम्यान अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्या घरी सीआयडीचं पथक दाखल झालं. दोन तास या पथकानं कामटेच्या घराची झडती घेतली. यावेळी युवराज कामटे हा सुद्धा या पथकासोबतच होता.
या झडतीत सीआयडी पथकाला महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. सांगली शहरातल्या स्पूर्ती चौकात व्यंकटेश समृद्धी अपार्टमेंटमध्ये युवराज कामटेचा फ्लॅट आहे. सांगलीत पोलीस कोठडीत मारहाण करून अनिकेत कोथळे या आरोपीची हत्या झाली. सीआयडीमार्फत आतापर्यंत झालेल्या चौकशीत अनिकेतच्या हत्येनंतर त्याच्या मृतदेहाची खाजगी डॉक्टरनं तपासणी केल्याचंही पुढे आलं आहे.
आरोपी पोलिसांनी स्थानिक दारु धंदेवाल्यांकडून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याआधी पैसे मागितल्याचंही पुढे आलं आहे. दुसरीकडे या प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळालंय. अश्लील सीडी प्रकरण दडपण्यासाठी अनिकेतची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. अनिकेतला खोट्या गुन्ह्यात अडकून संपवण्यात आल्याचा आरोपही त्याच्या नातेवाईकांनी केलाय.
या हत्येमागे व्यापारी निलेश खत्री आणि मध्यस्थी गिरिश लोहना यांचा हात असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केलाय. दोन व्यापा-यांसह अन्य दोघांचा या हत्येत हात असल्याचं नातेवाईकांनी म्हटलंय.