Cat Licence : मांजरप्रेमींनो लक्ष द्या, आताच लायसन्स काढलं नाही, तर खावी लागेल जेलची हवा?

 पाळलेल्या मांजरीवरुन झालेले वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेल्याचे प्रकारही घडलेत. त्यामुळेच महापालिकेनं मांजर पाळण्यासाठी आता नियम बनवलेत.

Updated: Nov 11, 2022, 11:17 PM IST
Cat Licence : मांजरप्रेमींनो लक्ष द्या, आताच लायसन्स काढलं नाही, तर खावी लागेल जेलची हवा? title=

सागर आव्हाड, झी २४ तास, पुणे : आतापर्यंत केवळ कुत्रा आणि घोडे पाळण्यासाठीच परवाना घ्यावा लागत होता. पण आता मांजर पाळण्यासाठीही परवानगी घ्यावी लागणार आहे. पुणे महापालिकेनं मांजर पाळण्यासाठी नियम बनवलेत. घरात मांजर पाळायचं असेल तर आता पुणे महापालिकेकडून अधिकृत परवाना घ्यावा लागणार आहे. 

अनेकदा शेजा-यांकडून पाळीव मांजरांच्या त्रासाबाबत मोठ्या संख्येनं तक्रारी महापालिकेकडे येतात. एका घरात तर दहा ते पंधरा मांजरं पाळली जात असल्याचं समोर आलंय. पाळलेल्या मांजरीवरुन झालेले वाद पोलिस स्टेशनपर्यंत गेल्याचे प्रकारही घडलेत. त्यामुळेच पुणे महापालिकेनं मांजर पाळण्यासाठी आता नियम बनवलेत.

मांजर पाळायची असेल तर आता परवाना (License) आवश्यक करण्यात आलाय. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने हा निर्णय जारी केला आहे. प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. पुढील आठ दिवसांत परवान्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाईल. महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार कुत्रा, घोडे (Dogs) अशा पाळीव प्राण्यांसाठी परवाना घ्यावा लागत होता. आता मांजरींसाठीही हा परवाना लागू करण्यात आला आहे. 

ऑनलाईन पद्धतीनं मांजर नोंदणीची प्रक्रिया असेल. आठवड्याभरात पुणे महापालिकेकडून ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. 

मांजरीची नोंदणी कशी कराल?

  • मांजर नोंदणीसाठी वर्षाला 50 रुपये भरावे लागतील
  • रहिवासी पुरावा, लसीकरण प्रमाणपत्र, मांजराचा फोटो आवश्यक
  • दरवर्षी परवान्याचे नूतनीकरण करावे लागेल
  • दरवर्षी 50 रु.परवाना शुल्काशिवाय अतिरिक्त 25 रु. शुल्क आकारलं जाईल

मांजर पाळण्यासाठी लायसन्स घेण्याचा हा पुणे पॅटर्न लवकरच महाराष्ट्रात राबवण्यात आला तर नवल वाटायला नको.