टी-वन वाघिणीचे दोन्ही बछडे सुखरुप, टी-टू वाघ घेतोय काळजी?

अवनीच्या मृत्यूनंतर वडील टी टू घेतायत बछड्यांची काळजी?

Updated: Nov 17, 2018, 04:37 PM IST
टी-वन वाघिणीचे दोन्ही बछडे सुखरुप, टी-टू वाघ घेतोय काळजी? title=

यवतमाळ : यवतमाळच्या राळेगाव जंगलात नरभक्षक टी वन वाघिणीला २ नोव्हेंबरच्या रात्री ठार मारल्यानंतर आता जवळपास १५ दिवसांनंतर तिच्या दोन्ही बछड्यांचे दर्शन वन विभागाच्या शोध पथकाला झालंय. शिवाय हे बछडे वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये टिपले गेलेत. ते सुदृढ आणि सुखरूप असल्याने वनविभागाचा जीव भांड्यात पडलाय.

टी वनचे दोन्ही बछडे कॅमेऱ्यात कैद

कक्ष क्रमांक १५५ मधून कक्ष क्रमांक ६५२ कडे जाताना हे दोन बछडे वन विभागाच्या मोबाइल स्कॉडला आढळून आले. त्यामुळे वन विभागाच्या वतीने १० पथक त्यांना शोधण्याच्या कामाला लागले आहेत. याच कक्षामध्ये लावण्यात आलेल्या कॅमेरामध्ये सुद्धा हे दोन बछडे ट्रॅप झालेले आहेत. 

अधिक वाचा :- सोशल मीडियावर 'अवनी'च्या मारेकऱ्यांचा निषेध 

आईच्या मृत्यूनंतर वडील घेतायत काळजी?

छायाचित्रावरून हे दोन बछडे शिकार करण्यास सक्षम असून आपले पोट भरण्यासाठी ते शिकार करीत असावे, असे वनविभागाने म्हटले आहे. शिवाय आई ठार झाल्यानंतर दोन बछड्याची काळजी वडील टी टू वाघ घेत असावा... कारण याच परिसरात त्याचा वावर असल्याचे आढळले आहे.

आपल्या मुलांचे संगोपन टी -टू वाघ करीत असल्याने त्यांची उपासमार होणार नाही असे वनविभागाला वाटते. आता या दोन बछड्यांना सुरक्षित रित्या जेरबंद करण्यासाठी मुंबई बोरीवली येथून डॉक्टरचे पथक आले असून, पाच व्हेटर्नरी डॉक्टर व १० पथक शोध घेत आहे.

अधिक वाचा :- अवनीच्या बछड्यांच्या उपासमारीची होती भीती

टी वन वाघिणीचा मृत्यू : चौकशी समितीची पुनर्रचना 

टी BV वाघीण मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस.एच. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आली होती. आता, या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. समितीचे तांत्रिकदृष्ट्या बळकटीकरण होण्यासाठी वन्यजीव क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले व्याघ्र तज्ज्ञ आणि सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज, बंगलोरचे संचालक डॉ. उल्हास कारंथ यांची समितीच्या सहअध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादूनचे संशोधक डॉ. पराग निगम यांची सदस्य म्हणून या समितीमध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.

आता ही समिती सहा तज्ज्ञांची असून यामध्ये वरील अध्यक्ष, सह अध्यक्ष आणि सदस्यांशिवाय डॉ. अनिश अंधेरिया- अध्यक्ष वाईल्ड लाईफ कन्झरवेशन, मुंबई, भारतीय वन्यजीव संस्थान देहरादूनचे डॉ. बिलाल हबीब यांचा सदस्य म्हणून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांचा सदस्य सचिव म्हणून समावेश आहे.

ही समिती टी-१ वाघिणीच्या मृत्यूप्रकरणात वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गतच्या तरतुदी, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले आहे किंवा कसे, याची खातरजमा व तपासणी करेल.