भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही - बाळासाहेब थोरात

भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा.... 

Updated: Jul 20, 2020, 01:12 PM IST
भाजपला दुधाचे आंदोलन करण्याचा अधिकार नाही - बाळासाहेब थोरात  title=

दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. यातच दूध दरांसाठी भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर काँग्रेसचं टीका सत्र सुरुच आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भाजपला निशाण्यावर घेत त्यांना दूध दरासाठीचं आंदोलन करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं ते म्हणाले.

'भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही', असं म्हणत भाजप सत्तेत असतानाही सलग तीन वेळा दुधाचे दर कोसळले होते. त्यावेळी शेतकरी तीन वर्षे आंदोलनही करत होते. पण, त्याकडे मात्र दुर्लक्ष केलं गेलं ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सरकार जातानाच त्यांनी थोडी मदत केली, असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षाला जोरदार टोला लगावला. महाविकासआघाडी सरकारनं मागील चार महिन्यांपासून दूध दराच्या प्रश्नात लक्ष घातलं आहे असं म्हणत थोरात यांनी भाजपला मात्र आंदोलनाचा अधिकार नाही, हीच बाब उचलून धरली. तेव्हा आता थोरातांचा हा टोला आणि त्यांनी अधिकारांबद्दल केलेल्या वक्तव्यावर विरोधी पक्षाची काय भूमिका असणार याकडे अनेकांचं लक्ष असेल. 

दरम्यान, सोमवारी दूध आंदोलनाला सुरुवात झाली. अकोला, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली. दुधाला प्रति लीटर ३० रुपये भाव द्या, केंद्रानं घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तात्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा या मागण्यांसाठी शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी संतप्त आंदोलक शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.

 

अजित नवले, दशरथ सावंत, महेश नवले, डॉ. संदिप कडलग, विजय वाकचौरे, शांताराम वाळुंज, रोहिदास धुमाळ, खंडू वाकचौरे, सुरेश नवले, शुभम आंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली होती.