अरे व्वा! 270 चौरस फुटाची सदनिका मिळणार 15 लाखांत

इमारतीत राहणाऱ्या भाडेकरुंसाठी आनंदाची बातमी.

Updated: Jun 15, 2021, 10:10 PM IST
अरे व्वा! 270 चौरस फुटाची सदनिका मिळणार 15 लाखांत  title=

किरण ताजणे / पुणे : पुण्यात महापालिकेच्या इमारतीत राहणाऱ्या भाडेकरुंसाठी आनंदाची बातमी. महापालिकेच्या इमारतीत राहणारे पुणेकर लवकरच त्याच घरांचे मालक होणार आहेत.. असा कोणता चांगला निर्णय घेतलाय पुणे महापालिकेने आणि त्याचा फायदा कुणाला आणि कसा होणार आहे, ते पाहा.

पुणे महापालिकेच्या मालकीच्या इमारतीत राहणारे भाडेकरू लवकरच त्या घरांचे मालक होणार आहेत. रस्ता रुंदीकरण प्रकल्पात बाधित झालेल्या नागिरकांचं पुनर्वसन सध्या महापालिका इमारतीत केलं जाते आहे. त्यांच्याकडून महापालिका दरमहा 450 रुपये भाडे आकारते. औंध, कोथरूड, वारजे कर्वेनगर, ढोले पाटील रोड आणि हडपसर भागात या इमारती आहेत. मात्र आता अशा 1512 सदनिका भाडेकरुंनाच विकण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. 270 चौरस फुटाच्या या सदनिका भाडेकरूंना 12 ते 15 लाख रुपयांना विकत घेता येतील.

पुणे महापालिकेच्या या निर्णयावर काहींनी आनंद व्यक्त केला. तर एवढे 15 लाख रुपये आणायचे कुठून, असा सवाल हातावर पोट असणा-या भाडेकरूंनी केला आहे. ही आनंदाची बातमी आहे. महापालिकेने चांगला निर्णय घेतला, असे भाडेकरु शंकर भालेराव यांनी म्हटले आहे.

भाडेकरूंना मालकी तत्त्वावर घर देण्याचा निर्णय पुणे महापालिका आणि भाडेकरू अशा दोघांच्याही हिताचा आहे. यामुळं पालिकेला मलसूल मिळणाराय. शिवाय सदनिकांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च वाचणार आहेत. तर भाड्याच्या घरात राहणाऱ्या मालकीचं छत मिळणार आहे.