पुणे : जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक चित्रांचा शोध लागलाय. परदेशातील संग्रहालयांमध्ये महाराजांची ही चित्रं जतन करण्यात आलीय. कुठल्या देशात आहेत छत्रपती शिवरारायांची १७व्या शतकातली चित्रं?
इसवी सन 1700 मधील ऐतिहासिक चित्रं
महाराष्ट्राची छाती अभिमानानं फुलून यावी, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास... हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवणा-या शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक, पुरातन, दुर्मीळ चित्रांचा आता शोध लागलाय... जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतल्या म्युझियममध्ये ही चित्रं असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी समोर आणलीय. गोवळकोंडा शैलीतली ही चित्रं सतराव्या शतकातील आहेत. दोन चित्रांवर पर्शियन आणि रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिलंय... या चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार, पायात मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी व गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे अलंकार दिसतायत. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि चेह-यावरची स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्यं चित्रात उतरलीय.
शिवकालीन चित्रांचं विदेशात जतन
चित्र क्र. १ जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयातील आहे. त्यात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखवलीय...
चित्र क्र. २ पॅरिसच्या खासगी वस्तुसंग्रहालयातील आहे. त्यात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार डाव्या हातात मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्ष्याचं शोभेचे पीस आहे.
चित्र क्र. ३ अमेरिका येथील फिलाडेल्फिया संग्रहालयातील आहे. चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कट्यार दाखवलीय. युरोपमधून हे चित्र पुढं अमेरिकेत हस्तांतरित झाले.
गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी.. तिथली ही प्रचलित चित्रशैली असल्यानं तिला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना ही चित्रे काढलेली असावीत किंवा त्यावेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने इ. स. १७०० पर्यंत काढलेली असावीत, असा अंदाज आहे. चित्रांमध्ये नैसर्गिक जलरंग आणि सोन्याचा वापर करण्यात आलाय..
ही तिन्ही चित्रं समकालीन म्हणजे एकाच कालखंडातील असल्यानं त्यांचं ऐतिहासिक मूल्य अधिक आहे. शिवछत्रपतींचा वैभवशाली इतिहास जतन करणारी ही चित्रं निश्चितच प्रेरणादायी आहेत.
पाहा झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट