पुणे : शिरूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि उद्योगपती आणि माणिकचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांचे मंगळवारी रात्री रुबी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
धारिवाल यांना न्यूमोनियाची लक्षणे आढल्याने त्यांना गेल्यामहिन्यात रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांदरम्यान त्यांच्या शरीरातील अवयव निकामी होत गेले. त्यानंतर प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. धारिवाल यांना यापूर्वी गालाच्या लाळग्रंथीचा कॅन्सर झाला होता.
माणिकचंद उद्योगाच्या माध्यमातून गेल्या सहा दशकांपासून धारिवाल यांनी उद्योगविश्वात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला होता. पान मसाला, पॅकेज्ड ड्रिंकिंग पाणी, बांधकाम व्यवसाय, नंदादीप कार्ड, प्रिटिंग यासारखे अनेक व्यवसाय त्यांनी सुरु केले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार आहे.
धारिवाल यांच्या देणगीतून पुणे आणि शहर परिसरात अनेक शाळा, मंदिरे उभारली गेली. भोपाळ, राजस्थान येथे त्यांच्या निधीतून हॉस्पिटल, मंदिरे उभारण्यात आली. त्यांच्यावर आज, बुधवारी घोडनदी (शिरूर) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.