विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: बुलडाण्यात मोर्चबांधणी सुरु

 लोकसभेनंतर विधानसभेची रणधुमाळी सुरु

Updated: Aug 21, 2019, 06:42 PM IST
विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम: बुलडाण्यात मोर्चबांधणी सुरु title=

मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : लोकसभेनंतर विधानसभेची रणधुमाळी सुरु झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ७ विधानसभा मतदारसंघातही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, सिंदखेडराजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर असे ७ विधानसभा मतदारसंघ आहेत. यातला मलकापूर लोकसभेच्या रावेर मतदारसंघाचा भाग आहे. जिल्ह्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे तीन, शिवसेनेचे दोन तर काँग्रेसचे दोन आमदार विजयी झाले होते. गेल्यावेळी राष्ट्रवादीला इथं आपलं खातंही उघडता आलं नव्हतं.

जळगाव जामोदमधून डॉ. संजय कुटे, खामगावमधून अॅड. आकाश फुंडकर आणि मलकापूरमधून चैनसुख संचेती हे भाजपाचे तीन आमदार निवडून आले होते. सिंदखेडराजामधून डॉ. शशिकांत खेडेकर आणि मेहकरमधून डॉ. संजय रायमुलकर या शिवसेनेच्या आमदारांनी बाजी मारली. तर बुलडाणामधून हर्षवर्धन सपकाळ आणि चिखलीमधून राहुल बोंद्रे हे काँग्रेसचे आमदार विजयी झाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी खासदारकीची हॅटट्रिक साधली. १ लाख ३३ हजार मतांच्या फरकानं त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांचा पराभव केला. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे बळीराम सिरस्कार यांनी तब्बल १ लाख ७२ हजार मतं मिळवल्यानं जाधवांचा विजयाचा मार्क सुकर झाला.

सध्याचं राजकीय चित्र पाहता बुलडाणा आणि चिखलीमध्ये काँग्रेसचंच वर्चस्व राहण्याची चिन्हं आहेत. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या, पण चिखलीच्या भाजपाच्या माजी आमदार असलेल्या रेखा खेडेकर पुन्हा भाजपामध्ये परतण्याचे संकेत आहेत. मेहकरमध्ये विद्यमान शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या ऐवजी बदली उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी खातेही उघडता न आलेल्या राष्ट्रवादीला सिंदखेडराजामध्ये अनुकूल वातावरण दिसतंय. मात्र विधानसभेला महायुतीचाच झेंडा कायम राहिल, असा दावा शिवसेनेकडून केला जातोय.

जळगाव जामोद हा पालकमंत्री डॉ. संजय कुटेंचा मतदारसंघ. सध्या तरी त्यांनाही पर्याय दिसत नाही. खामगावमध्ये भाऊसाहेब फुंडकर विरुद्ध दिलीप सानंदा अशी लढाई असायची. भाऊसाहेबांच्या निधनानंतर यंदा पहिल्यांदाच निवडणूक होणार असून, वंचित बहुजन आघाडीची भूमिका इथं निर्णायक ठरणार आहे. तर मलकापूरमधून भाजपाचे चैनसुख संचेती हे सहाव्यांदा पुन्हा निवडून येण्याची शक्यता आहे.

बुलडाण्यात चांगला पाऊस झाल्यानं दुष्काळाचा प्रश्न मार्गी लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विकासाचं राजकारण यावरच युतीचा भर असेल, असं दिसतंय. तर वंचित बहुजन आघाडी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत येईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांना वाटतोय. मात्र तसं झालं नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी ती मोठी डोकेदुखी ठरणार आहे.