औरंगाबाद : राज्यात भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असून, यासंबधीचे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील नुकतेच केले होते. मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षाला महाविकास आघाडीत सामिल करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती 'झी २४ तास'च्या हाती आली आहे,
राज्यात भाजपला रोखण्यासाठी तसेच मतांची विभागणी टाळण्यासाठी एमआयएम पक्षालाही महाविकास आघाडीत सामिल करण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आणि इम्तियाज जलील यांच्यामध्ये बैठक पार पडली. त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर एमआयएमचा निरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
'भाजपकडून होणा-या आरोपांना घाबरू नका, मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही...' असं शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांच्या बैठकीत गुरुवारी सांगितलं. भाजप राजकीय प्रतिस्पर्धी असला तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत. परिश्रम घेण्याची तयारी आणि नियोजन त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं.
गुरूवारी संध्याकाळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत पवारांची बैठक झाली. या बैठकीतही विधिमंडळात भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्याचा निर्णय झाल्याचं समजतंय. दुसरीकडे भाजपनंही शरद पवार यांना प्रतिआव्हान दिलं आहे.