सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : हाडांची भूकटी तयार करणाऱ्या कारखान्यामुळे (Bone powder manufacturing factories) नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यात अशा प्रकारचे चार कारखाने आहेत. या कारखान्यामधुन निघणाऱ्या भयानक दुर्गंधीमुळे नागरिक, शेतकरी हैराण झाले असून त्यांच्या आरोग्यावर याचा परिणाम होत आहे (endanger the health of citizens). वारंवार तक्रार करुनही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे.
नांदेड जिल्ह्यातील बिलोली मधील नागरिक हाडांची भूकटी तयार करणाऱ्या कारखान्यांच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झाले आहेत. या कारखान्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बिलोली जवळील कोंडलापुर परिसरात हाडापासून भुकटी तयार करणारे चार कारखाने सुरू झाले आहेत.
या कारखान्यांमध्ये विविध प्राण्यांच्या हाडापासून भूकटी तयार करण्यात येते. यासाठी वापरण्यात येणारे सडलेले मांस आणि हाडांमुळे प्रचंड परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे. कोंडलापुर आणि बिलोली मधील गंगा नगर, आंबेडकर भागातील नागरिक या दुर्गंधीमुळे आजारी पडत आहेत. अनेकांना वासामुळे अस्वस्थ वाटत आहे. तर, अनेकांना उलटी मळमळ यासारखे त्रास होत आहेत.
या कारखान्यांमधून निघणारी दुर्गंधी दूरवर पसरत आहे. या दुर्गंधीमुळे शेतात काम करायला मजूर देखील मिळत नाही. हे कारखाने कुठलेही निकष पाळत नसून त्यांना रीतसर परवानगीही देण्यात आलेली नाही असा आरोप स्थानिकांनी केला आहे. लेखी तक्रार करूनही प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे.
तहसील कार्यालयाने याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र देखील पाठवले आहे. तर, नांदेडचे उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालय वरिष्ठ कार्यालयाला याबाबत कळवले असल्याचे सांगून हात झटकत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.