..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तर

Pravin Darekar On Mahayuti:  'आमचे कार्यकर्तेदेखील मनावर दगड ठेवून सर्वाला सामोरे जात आहेत, हे रामदास कदमांनी लक्षात ठेवावं, असे दरेकरांनी सांगितले.

Pravin Dabholkar | Updated: Aug 19, 2024, 01:49 PM IST
..तर आमचीदेखील युती तोडण्याची तयारी- भाजपकडून शिंदे गटाला प्रत्युत्तर title=
Darekar On Mahayuti

Pravin Darekar On Mahayuti:  'राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू', असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दिले. ठाणंपण आमचं, कोकणंपण आमचंच, जिथे युती आहे तिथे गुडघ्याला बाशिंग बांधून आम्हीच लढणार, असे लोकसभेला पाहिले. असे असेल तर युती तोडा आणि तुमचं तुम्ही लढा असे रामदास कदम म्हणाले. याला आता भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. युती तोडायची असेल तर आमचीदेखील तयारी आहे, असे प्रत्युत्तर भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले. रामदास कदमांसारख्या वरिष्ठ नेत्याने असे वक्तव्य करणं अपरिपक्व आहे. शिंदे-फडणवीसांसोबत बसून हा प्रश्न सोडवता आला असता. रविंद्र चव्हाणांबद्दल पहिलं तुम्ही बोललात. तक्रार फडणवीसांकडे करायला हवी होती, असे दरेकर म्हणाले.

'युतीची गरज फक्त भाजपला नाही'

महायुती असताना धर्म पाळायला पाहिजे. भाजपच्या कार्यकर्त्यांची अस्वस्थता समजून घ्या. नरेश म्हस्के, रविंद्र वायकरला आमच्या कार्यकर्त्यांनी खासदार केलं. युतीची गरज सर्वांना आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आहे. चांगल्या वातावरणात मिठाचा खडा टाकू नये. उणीधुणी काढली तर आमचीही तयारी आहे. युतीची गरज फक्त भाजपला आहे, असं रामदास कदमांना वाटत असेल तर त्यांचा तो गोड गैरसमज आहे. आमचे कार्यकर्तेदेखील मनावर दगड ठेवून सर्वाला सामोरे जात आहेत, हे रामदास कदमांनी लक्षात ठेवावं, असे दरेकरांनी सांगितले.

रामदास कदमांची वैफल्यातून खदखद

हे व्यक्तिगत कारणातून आलेलं वैफल्य आहे. रामदास कदम यांचा मुलगा ज्या ठिकाणी आमदार आहे, तिथे त्यांना भाजपची गरज आहे. त्यांना मंत्री व्हायच होतं. ते न झाल्याने अस्वस्थ आहे. वैफल्यातून त्यांची खदखद बाहेर येत असल्याचे दरेकर म्हणाले.

Ramdas Kadam Exclusive: 'राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू'

तर आम्हीदेखील तयार 

सारख लांडगा आला रे करण्याची आवश्यकता नाही. भाजपच्या कार्यकर्त्यांचा सयंम आहे. याला दुबळेपणा समजू नका. भाजप राष्ट्रीय पक्ष आहे. सारखे हुलकावण्या देणार तर आम्हीदेखील ऐकणार नाही, असे दरेकर म्हणाले. 

काय म्हणाले रामदास कदम?

कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई महामार्गाच्या प्रश्नावरुन सुरु झालेला वाद आता शिवसेना-भाजप युतीतील जागांवर पोहोचला आहे.  रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा थेट हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय.. देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली. तर दापोलीमध्ये भाजप कार्यकर्ते सहकार्य करत नासल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासाठी फडणवीसांकडं तक्रार केल्याचंही त्यांनी म्हटलंय.कोकणातील रस्त्यांवरून रामदास कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाहीय. चाकरमान्यांचे हाल होतायत. समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. रविंद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. अशी टीका रामदास कदमांनी केली. मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून माझी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांना मी हे पत्र देईन. ते काय कार्यवाही करतात ते पाहीन. 2019 मध्ये युती असताना दापोलीच्या भाजपच्या लोकांनी माझ्या मुलाला मतदान केलं नाही. ही बाब मी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिली. पण यात काही फारसा बदल झालेला दिसत नाही. मुंबई-गोवा महामार्गामुळे आमचे हाल होतायत. आम्ही काय पाप केलंय? 14 वर्षे का लागतात? याचं उत्तर आम्हाला कोण देईल? आमच्या व्यथा आम्ही कुठे मांडायच्या? रविंद्र चव्हाण हा माणूस युती कशी तुटेल हे पाहतोय. आमच्या जिल्ह्यात येतात पण शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी माझ्याशी कधीच संपर्क साधला नाही, असे रामदास कदम म्हणाले.

रामदास कदमांच्या उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या, 40 वर्षात एकतरी काम केलेलं दाखवा- रविंद्र चव्हाण संतापले