प्रशांत परदेशी, धुळे : धुळे महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची रंगत दिवसागणिक वाढत चालली आहे. भाजप विरुद्ध भाजप असं चित्र असताना विरोधकांनीही आपले सामर्थ्य वाढविण्यासाठी व्युहचना आखली आहे. गोटे विरुद्ध भाजप हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे तर गुन्हेगारांचे संरक्षक कोण आहेत हे,भाजपच्या पदाधिकारी आणि नेत्यांनीही सांगून टाकल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपच्या दोन्ही गटांवर हल्ला केला आहे.
धुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या दोन गटांनी सर्वाधिक चर्चेच्या केंद्रस्थानी राहून, विरोधी पक्षाची पोकळी व्यापली होती, मात्र आता विरोधकांनीही आपले निवडणूक आखाडे अजून प्रभावी करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. भाजप आणि आमदार गोटे एकमेकानवर आरोप करून धुळे महापालिकेची निवडणूक केंद्रित करू पाहत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तर आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना अद्दल घडविण्यासाठी काही ठिकाणी जातीची तर काही ठिकाणी नात्यांमध्येच जुंपवून दिली आहे. पण यानिमित्ताने राष्ट्रवादीनेही भाजपवर शरसंघान साधल आहे.
भाजपमधील दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल असं धुळेकर दबक्या आवाजात बोलत आहेत. भाजपाची वाट बिकट दिसत असली तरी शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीलाही धुळे विजयासाठी आरोप प्रत्यारोपांच्या पुढे जात ठोस विकास आराखडा धुळेकरांसमोर ठेवावा लागणार आहे.