मुंबई : Three-party coalition almost finalised in 2017 - Ashish Shelar : राज्यातील राजकारणातील मोठा गौप्यस्फोट भाजपकडून करण्यात आला आहे. भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी या त्रिपक्षीय आघाडीचा प्रस्ताव 2017 मध्येच आला मांडला होता, असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेनेला सोबत घेण्यास तेव्हा राष्ट्रवादीचा विरोध होता. आता मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तापिपासूपणामुळे एकत्र आलेत अशी टीका शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला. राष्ट्रवादीने ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही, असे त्यावेळी म्हटले होते आणि आता पाहा कसे जमले आहे. आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असे वाटावे. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते याची साक्षीदार भाजप आहे, असे म्हणत शेलार यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
2017 मध्येच राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करुन घेऊन राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढवायच्या याची सगळी चर्चा भाजप वरिष्ठ नेतृत्वासह झाली होती, असे शेलार म्हणाले. एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. शिवसेनेचे नेते हे राजीनामे खिशात ठेवल्याची जहरी भाषा करत होते. तेव्हा राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेताना खात्यांचं वाटप, निवडणुकांमधील जागावाटप अशी चर्चा झाली होती असं शेलार म्हणाले.
शिवसेनेला सरकारमधून दूर करु नका, असा आदेशही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिला होता. आम्हाला शिवसेनेला सरकारमधून काढायचे नव्हते. हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेची साथ सोडू नये, अशी भाजपचा प्रामाणिक भूमिका होती असं शेलार म्हणाले. त्याचवेळी आशिष शेलार म्हणाले की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते.