"एकनाथ शिंदे समजूतदार, पण आमच्या मनात...", फडणवीसांचा उल्लेख करत राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान

Radhakrishna Vikhe Patil on Fadnavis: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी म्हटलं आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा भाजपा मुख्यमंत्रीपदावर दावा करत असल्याची चर्चा रंगली आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 23, 2023, 08:48 AM IST
"एकनाथ शिंदे समजूतदार, पण आमच्या मनात...", फडणवीसांचा उल्लेख करत राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं विधान title=

Radhakrishna Vikhe Patil on Fadnavis: राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेतून बंडखोरी करत बाहेर पडलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपाच्या सोबतीने राज्यात सरकार स्थापन केलं. भाजपानेही सर्वांना धक्का देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. तर दुसरीकडे इच्छा नसतानाही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं लागलं. मात्र भाजपा नेते जाहीरपणे देवेंद्र फडणवीसच आपचे खरे मुख्यमंत्री असल्याची विधानं करत आहेत. त्यातच आता राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलेल्या विधानामुळे नव्याने ही चर्चा रंगली आहे. 

राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

राधाकृष्ण विखे पाटील यांना तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण असं विचारण्यात आलं असता त्यांनी देवेंद्र फडणवीस असं उत्तर दिलं. ते म्हणाले की "देवेंद्र फडणवीस हेच मनातील मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट आहे. सध्या युतीचं सरकार असून एकनाथ शिंदे हे समजतूदार आहे. पण भाजपाच्या वतीने बोलायचं गेल्यास देवेंद्र फडणवीस आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत".

शिर्डी मतदारसंघातील राहाता येथे प्रकट मुलाखती दरम्यान ते बोलत होते. दरम्यान यावेळी त्यांना अजित पवारांच्या मनात काय? असं विचारलं असता ते म्हणाले "शरद पवार राज्याला नेहमी संभ्रमित ठेवतात. मात्र आता अजित पवारांना त्यांना सुद्धा संभ्रमित केलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या मनात काय हे कुणाला समजणार?".

चंद्रशेखर बावनकुळे यांनीही केलं होतं विधान

डिसेंबरमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असं विधान केलं होतं. "जो जो समाज फडणवीस यांच्याडे गेला, त्या समाजावरी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे मी भाजप प्रदेशाध्यक्ष असताना देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत," असं ते म्हणाले होते. 

देवेंद्र फडणवीसांमागे सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना फक्त मुख्यमंत्री पदावर बसवण्याकरिता नाही, तर महाराष्ट्राचं भवितव्य हे देवेंद्र फक्त देवेंद्र फडणवीसच घडवू शकतात, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

फडणवीसच आमचे खऱे मुख्यमंत्री- चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनीही देवेंद्र फडणवीस आमचे खरे मुख्यमंत्री आहेत, असं म्हटलं होतं. तसंच एकनाथ शिंदे मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री झाल्याच्या त्यांच्या विधानानेही गदारोळ माजला होता.