या दसऱ्याला पंकजा मुंडे यांच्या मनात सीमोल्लंघन? नव्याने फुंकणार का रणशिंग?

दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत, गेल्या दोन वर्षातील संघर्ष, यश-अपयश याबद्दल बोलणार

Updated: Oct 14, 2021, 08:46 PM IST
या दसऱ्याला पंकजा मुंडे यांच्या मनात सीमोल्लंघन? नव्याने फुंकणार का रणशिंग? title=

विष्णू बुर्गे आणि विशाल करोळे झी मीडिया : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या सावरगावमधल्या भगवान भक्तीगडावर (Bhagwan Bhakti Gad) होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे (Dasara Melava) संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. प्रशासनाने नियम आणि अटींसह दसरा मेळाव्याल परवानगी दिली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये ज्या काही घटना घडल्या संघर्ष यश-अपयश या संदर्भात मी दसरा मेळाव्यात बोलणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर पंकजा मुंडे नव्याने रणशिंग फुंकणार आहेत.

दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत

दोन वर्षात खूप गोष्टी मनात साचल्या आहेत. तुमचंही ऐकायचं आहे, मलाही बोलायचं आहे. या दोन वर्षात अनेक घटना घडल्या. अनेक संघर्ष, अनेक यश-अपयश याची सर्व कहाणी. तिथून आपण कोणती उमेद घ्यायची आणि भविष्याचा प्रवास कसा करायचा हा भाषणाचा सूर असेल. मी काय बोलणार याकडं सर्वाचं लक्ष आहे, माझंही लक्ष आहे, कारण मी जे काही बोलते ते स्वयंप्रेरणेने, स्वयंस्फूर्तीने बोलते. भगवान बाबांच्या आशिर्वादाने आणि मुंडे साहेबांच्या संस्कारावर आधारीत बोलते. त्यामुळं आपण कोरोनाचे नियम पाळून कार्यक्रमाला उपस्थित राहावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पंकजा मुंडे मराठवाड्यातील राजकारणातलं एक मोठं नाव. गोपीनाथ मुंडे यांची वारस असलेल्या पंकजा यांनी त्यांचा राजकीय वारसा सुद्धा तेवढ्याच जोमाने जपला आणि वाढवला सुद्धा. पंकजा यांचं त्यांच्या मतदार संघात आणि आजूबाजूला तब्बल 8 मतदार संघात वलय आहे आणि तेच जपण्यासाठी वाढवण्यासाठी त्यांचा हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. 

लोकांच्या मनातील मुख्यमंत्री?

3 वर्षापूर्वी दसऱ्या मेळाव्याला पंकजा मुंडे यांनी भाजप नेते अमित शाह यांना आमंत्रण दिलं होतं. आणि इथूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री पंकजा असल्याचा जयघोष सुरू केला होता. त्याचा फायदा होण्याऐवजी पंकजा मुंडे यांना त्याचा त्रासच अधिक झाला. मात्र राजकीय दृष्ट्या त्यांचं शक्ती प्रदर्शनही सगळ्यांनी पाहिलं आहे. 

आता उद्याच्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे पुन्हा काय बोलणार याकडे समर्थक आणि राज्यातील राजकारण्यांचं लक्ष लागलं आहे. गेल्या दोन वर्षात पंकजा मुंडे यांची मतदार संघातील ताकद कमी झाल्याचं बोललं जात आहे. त्यातच पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं मतदार संघावरचं लक्षही कमी झालं. पंकजा मुंडे यांचे बंधू आणि पालकमंत्री धनंयज मुंडे यांनी संधीचा फायदा घेत वर्चस्व प्रस्थापित करण्यात चांगलंच यश मिळवलं आहे. 

पंकजा मुंडे यांच्या समोरचं आव्हान आता वाढलं आहे. त्यामुळे पक्षात असलेली घुसमट व्यक्त करताना धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडे प्रहार करण्याची शक्यता आहे. मेळाव्याच्या पूर्व संध्येला त्यांनी याचे संकेत सुद्धा दिले आहेत. सत्ताधारी माफिया आता जिल्ह्याचे राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  

जिल्ह्याला आम्ही चांगल्या सवयी लावल्या होत्या, चांगले अधिकारी आणले, तुम्ही सर्व पायदळी तुडवलं, मी मोदींच्या काळात 52 हजार कोटी विकासासाठी  आणले, 992 कोटींचा विमा आणले तुम्हीं काय आणले असा सवाल करीत त्यांनी हल्लाबोल केला आहे. यातून पंकजा यांचे मनसुबे स्पष्ट झाले आहेत. कोरोनामुळे लोक त्रस्त असताना पालकमंत्री घरात हातमोजे घालून बसले होते तर माझे लोक रस्त्यावर फिरत होते असे सांगत त्यांनी आता 'टार्गेट धनंजय' असा इशाराच बोलण्यातून दिला आहे.

पंकजा मुंडे यांना पक्षातून डावलले जात असल्याची भावना तयार होत असताना आपला बालेकिल्ला हातातून निघू नये यासाठी पंकजा यांचा हा मेळावा महत्वाचा आहे. पराभवानंतर विधान परिषद मिळाली नाही, बहीण प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद सुद्धा मिळालं नाही. उलट राज्याच्या राजकारणातून पंख छाटून त्यांना थेट देशाच्या राजकारणात नेण्यात आलं. मात्र पंकजा यात खुश नसल्याचं बोललं जात आहे. त्यांची महत्वकांक्षा मोठी आहे आणि त्यामुळे आता पक्षात काय चाललंय आणि त्यातून असलेली खदखद सुद्धा पंकजा या मेळाव्यात मांडतील अशी शक्यता आहे.

कोरोनामुळे गेल्या वर्षी दसरा मेळावा होऊ शकला नाही. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर मेळावा घ्यायचा असा पंकजा यांचा मानस आहे. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. यातून जिल्ह्यातील राजकारणात आणि राज्यातील राजकारणात त्यांना त्यांचं वजन तर दाखवायचे आहेच, सोबत त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एक संदेश ही द्यायचा आहे. शिवाय काहीशा दुरावलेल्या त्यांच्या पारंपरिक मतदाराला, त्यांच्या समाजाला साथही द्यायची आहे. ओबीसी राजकारणातून पुन्हा त्यांना तेवढ्याच वेगाने कमबॅक करण्याची संधीही साधायची आहे. आता दसरा मेळाव्याचा माध्यमातून पंकजा मुंडे हे कसं साधणार याचीच उत्सुकता आहे.