मुंबई : आम्ही युतीमध्ये भाजपमुळे 25 वर्ष सोडलो आणि म्हणूनच आम्ही युती तोडली असा पुनरुच्चार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. या विधानाबरोबरच त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यानंतर आता भाजपकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत गजनी झाले होते, आता स्वतःच केलेल्या विधानबाबतही गजनी झाले की काय? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. हे विधान त्यांनी मागच्या पालिका निवडणुकीच्या वेळी केले. त्यानंतर त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला युती केली. नरेंद्र मोदी यांच्या नावे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मतं मिळवली.
युतीमध्ये मत मिळवून नंतर जनतेचा विश्वास घात केला. यांनी हिंदुत्वाला तिलांजली देत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जीवावर मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री महोदय तुमची समरण शक्ती तोकडी असेल जनतेची नाही असा टोलाही अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांना लगावला आहे.
शिवसेना विरुद्ध भाजप पुन्हा एकदा शब्दीक युद्ध रंगताना पाहायला मिळत आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना विरुद्ध भाजप एकमेकांविरुद्ध टीका करत आहेत.